भुसावळ :- जिल्हाभरात सुरू असलेल्या दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्रास बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. जळगाव जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील व अभ्यासक्रम प्रशिक्षण जिल्हा समन्वयक डॉ.राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्रांतर्गत दहावीच्या विषय शिक्षकांचे 9 एप्रिलपासून प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी मराठी विषयाचे प्रशिक्षण पार पडले.
विविध शाळांना भेटी
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे तथा बालभारती पुणे येथील मराठी विषय अभ्यास गट सदस्य तथा द.शि.विद्यालयाचे उपशिक्षक डॉ.जगदीश पाटील यांनी जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेच्या निर्देशानुसार निवडक प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. त्यात रावेर येथील मॅक्रो व्हिजन स्कूलमधील प्रशिक्षण वर्गापासून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मुक्ताईनगर येथील एकनाथराव खडसे टॅलेन्ट स्कूल, बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल, जामनेर येथील उर्दू हायस्कूल, भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालय व यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी माध्यमिक विद्यालय या प्रशिक्षण केंद्रांना संपूर्ण दिवसभरात भेटी देण्यात आल्या.
‘मराठी’ विषय म्हणून नव्हे तर भाषा म्हणून शिकवा -प्रा.जगदीश पाटील
प्रशिक्षणादरम्यान डॉ. जगदीश पाटील यांनी दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम स्वरूप, क्षमता विधाने, पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये, विद्यार्थी केंद्रित पाठ्यपुस्तक, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देऊन स्वमत व अभिव्यक्ती मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे पाठ्यपुस्तक तसेच कृतिपत्रिकेतून निम्न व उच्च बोधात्मक क्षमतांचा विकास व ज्ञानरचनावाद, कृतियुक्त अध्यापन पद्धती, ई-लर्निंग अशा वैविध्यपूर्ण घटकांचा पाठ्यपुस्तकात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी हा विषय म्हणून नव्हे तर भाषा म्हणून शिकवावा यासाठी पाठ्यपुस्तकात भाषिक कौशल्याच्या माध्यमातून सृजनशक्तीला वाव असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. दहावी मराठी विषय शिकवणार्या विषय शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रत्येक केंद्रावर दिवसभरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अभ्यासक्रम आराखड्याबाबत मार्गदर्शन केले.