प्रशिक्षण म्हणजे जनसेवेचे व्रत आहे – दत्ता पडसलगीकर

0

लोणावळा : लोणावळ्यातील खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र राज्यातील सर्वोत्तम केंद्र आहे. या केंद्रात प्रशिक्षण घेणार्‍या सर्व प्रशिक्षणार्थींनी उच्चदर्जाचे प्रशिक्षण घेऊन राज्य व जनतेचे रक्षण करून सेवा करावी. तसेच येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणापलीकडचे शिक्षण व उपक्रम राबवून येथील प्रशिक्षणार्थी सर्वगुणसंपन्न करावा. प्रशिक्षण ही नोकरी नसून, जनतेच्या सेवेचे व्रत आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केले. लोणावळ्यातील खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारत, विद्यासंकुल व वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

जनतेच्या सेवेसाठी प्रशिक्षण

पडसलगीकर पुढे म्हणाले की, आपण सारे इथे चांगले पोलीस बननण्यासाठी आला आहात. प्रशिक्षण घेताना आपण जनतेच्या सेवेसाठी या कामात आलो आहोत, हे लक्षात ठेवा. आपल्यातील माणुसकी जपली पाहीजे. काही मुठभर चुकींच्या लोकांमुळे संपूर्ण पोलीस दलाला भ्रष्टाचारी म्हणले जाते. त्यामुळे आपण सामान्य माणसांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सहकार्यासाठी उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळेच हे प्रशिक्षण घेताना हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण व खास पथक प्रमुख संजय सक्सेना, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, भारतीय नौदलाचे कंमाडर निवासन, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, महामार्ग पोलीस अधिक्षक अमोल तांबे व खंडाळा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील उपस्थित होत्या. यावेळी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय भुवन, राणी लक्ष्मीबाई वसतिगृह व ज्ञानप्रकाश विद्यासंकुलाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या स्मिता पाटील यांनी केले.