प्रश्न विचारून शासन व्यवस्थेला हादरवून सोडा!

0

पुणे । सध्या आजूबाजूला सुरु असलेली असुरक्षितता, मुस्कटदाबी पाहिली असता मन उद्विग्न होत आहे. मात्र या उद्विग्नतेने निराश न होता शासन आणि व्यवस्थेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून सोडावे, असे आवाहन ज्येष्ठ दिगदर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांनी केले. सकाळी मुसळधार पावसात महर्षी शिंदे पुलावरून सुरु झालेली अंनिसची जबाब दो निषेध रॅली साने गुरुजी स्मारक येथे पोहचली. त्यावेळी तिथे झालेल्या निर्धार सभेत अमोल पालेकर बोलत होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मुक्ता मनोहर, श्रीपाल ललवाणी उपस्थित होते. बोगद्यातून जाताना सर्वत्र अंधकार असताना टोकाला उजेडाचा कवडसा दिसत असतो. तसा सगळीकडे अंधकार असतानाही निराश न होता व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून टाकावे, असे पालेकर यांनी सांगितले.

पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात : सरदेसाई
आज काल मोठमोठे चॅनल आणि त्यांचे पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात; पण नरेंद्र दाभोलकर कधी घाबरले नाही. आजची पत्रकारिता पैशाच्या ताकदीला बळी पडत आहे. मात्र, दाभोलकर कशाच्या पुढे झुकले नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने आयोजित निषेध रॅलीनंतर ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सरदेसाई म्हणाले की, श्री श्री रवी शंकर, आणि बाबा रामदेव यांच्या वर आजकल कोणी बोलायला तयार नाही, कोणताही पत्रकार कोणताही चॅनल त्यांच्यावर बोलत नाही. कारण त्यांच्याकडे पैशाची ताकद आहे. तसेच राजनैतिक पाठबळदेखील या लोकांना लाभत आहे. पतंजली हा सर्वात मोठा जाहिरातदार आहे. त्यामुळे कोणताही मीडिया त्यांच्यावर लिहिण्यास दाखवण्यास घाबरत आहे. पत्रकारिता हा टीआरपीचा व्यवसाय झाला आहे. ज्या बातम्यांना टीआरपी आहे तीच दाखवली जाते. देशहिताशी कोणाला देणे घेणे नाही. मीडिया एक तमाशा झाला आहे. रोज रात्री मोठमोठ्या चैनल वर 10 लोकांना बोलवून चर्चासत्राच्या नावाखाली तमाशा दाखवला जातो. पहिले हे हिंदीमध्ये होते आता मराठीतही सुरू झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र सरकारला त्यांचे मारेकरी शोधण्यात सातत्याने अपयश येत आहे. खरंतर, सरकारला मारेकरी शोधायचे आहेत का, हाच प्रश्न आता पडतो. हे सरकारच आज दहशतवाद पोसत आहे ! एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणार्‍यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकार दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट आहे.
– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

शासनाकडून फसवणूक
स्वातंत्रानंतर 70 वर्षांनी सुराज्याची अवस्था पाहिली असता आज समाज सुधारणेचा आग्रह धरणार्‍या गोपाळ गणेश आगरकर यांची आठवण येत आहे. त्यामुळे नव्या स्वातंत्र लढ्याची सुरुवात केली पाहिजे, असे विद्या बाळ यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात शासनाकडून फसवणूक झाल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त सकाळी रॅली काढण्यात आली.

डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेक़र्‍यांना कधी पकडणार याचा शासनाला जाब विचारण्यासाठी ही रॅली निघाली होती. रॅलीची सुरुवात करताना बाबा आढाव म्हणाले, एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणार्‍यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकारला दहशतवाद पोसायचा असल्याचे दिसून येते. रॅलीमध्ये मुक्ता मनोहर, हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

”जबाब दो”ट्विटरवर ट्रेंड
अंनिसच्या वतीने दाभोलकरांना कोणी मारलं या सवालासह जबाब दो” हा हॅशटॅग सोशल मीडियावर चालवण्यात येत होते. त्याला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी हा हॅशटॅग वापरला. दिवसाअखेर हा सर्वाधिक वापरलेल्या ट्रेंड यादीमध्ये या हॅशटॅगचा समावेश झाला होता.

पावसातही निषेध रॅलीला चांगला प्रतिसाद
डॉ दाभोलकर यांची हत्या झालेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून सकाळी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे किती कार्यकर्ते उपस्थित राहतील, याबाबतची शंका व्यक्त करण्यात येत होती. पण मागील वर्षापेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते भर पावसात निषेध रॅलीमध्ये सामील झाल्याचे दृश्य बघायला मिळाले.