प्रसंगी प्राणाची आहुती देऊ

0

बिजलीनगर ते कासारवाडी परिसरातील शेकडो बांधकामधारकांच्या आंदोलनाचे नऊ महिने
कासारवाडी येथील कोपरा सभेत रिंग रोड बाधितांचा निर्धार

पिंपरी-चिंचवड : मुठभर लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी प्रकल्प राबविणे म्हणजे शहराचा विकास नाही. जबरदस्तीने सदरचा रस्ता बनविण्याचा प्रयत्न कोणी केला तर प्रसंगी प्राणाचा त्याग करू.पण आमचे घर उध्वस्त करू देणार नाही, असा निर्धार रिंगरोड बाधितांनी कासारवाडी येथील कोपरा सभेत केला. रविवारी ज्ञानराज विद्यालयात ही सभा झाली. परिसरातील रिंग रोड बाधित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 9 महिन्यांपासून (284 दिवस) पिंपरी-चिंचवडमधील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील रिंग रोड बाधित हक्कांच्या घरासाठी आंदोलन करत आहेत. कालबाह्य एचसीएमटीआर 30 मीटर रस्त्यामुळे 3500 घरे बाधित होत आहेत. 25 हजार नागरिक रस्त्यावर येणार आहेत. सभेस मुख्य समन्वयक विजय पाटील, शिवाजी इबितदार, प्रदीप पवार, रेखा भोळे, अमर आदियाल, निकिता पाटील, मोहन भोळे आदी उपस्थित होते.

रिंगरोडमुळे मोठा विकास नाही
या प्रसंगी रहिवाशी मंगल नायकोडी म्हणाल्या, गेल्या 35 वर्षांपासून आम्ही या परिसरात राहत आहोत. पालिका प्रशासनाने कधीही पूर्वी रिंग रोड बाबत तसेच संबधित रस्ता आरक्षणाबाबत परिसरातील नागरिकांना कळविले किंवा सूचित केले नाही. अचनाकपणे गेल्या वर्षांपासून या रस्त्याबाबतचे बाटलीबंद भूत प्रशासनाने अचानकपणे प्रगट केले. त्यामुळे आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबे बेघर होणार आहेत. पर्यायी मार्गाचे मोठे जाळे असताना सदरच्या रस्त्याची आवश्यकता नाही. शहराचा विकास करण्यासाठी अनेक प्रकल्प राबविण्यासारखे आहेत. हा रस्ता केल्यानेच शहराचा खूप मोठा विकास होणार ही अतिशयोक्ती आहे. मुठभर लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी प्रकल्प राबविणे म्हणजे शहराचा विकास नाही. जबरदस्तीने सदरचा रस्ता बनविण्याचा प्रयत्न कोणी केला तर प्रसंगी प्राणाचा त्याग करू.पण आमचे घर उध्वस्त करू देणार नाही.

न्याय मिळेपर्यंत संघर्ष
मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले, 1986 पासून शहरात विकास आराखडयानुसार तसेच त्याव्यतिरिक्तही वाहतुक व दळणवळण करीता मोठ्या प्रमाणात रस्ते तसेच उड्डाणपूल आणि ग्रेड सेप्रेटर यांची निर्मिती करण्यात आली. पुणे शहरांपेक्षा दुप्पट प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यांची निर्मिती या 15 वर्षांमध्ये करण्यात आली. असे असताना रिंग रोड चा कालबाह्य झालेला व राज्य शासनाची मंजुरी नसलेला एचसीएमटीआर प्रकल्प नागरिकांची हजारो घरे पाडून बनविणे नियमबाह्य आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन करून रस्ता बनविणे घटनाबाह्यच ठरते. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठयावा लागेल.

घरमालकांचे जीवन भयभीत
समन्वयक प्रदीप पवार म्हणाले, गेले 9 महिने शहरातील रिंग रोड बाधित भयभीत अवस्थेत जगत आहेत. 210 दिवसांपासून पालिकेने स्थापन केलेली अवलोकन समिती अद्याप कागदावरच आहे. रिंग रोड बाधितांचा प्रश्‍न माननीय मुख्यमंत्र्यानी तातडीने मिटवावा असेच आंदोलन करणार्‍या राहिवश्यांना वाटते. स्थानिक राजकीय व्यवस्थेने आणि प्रशासनाने या महत्वाच्या नागरी प्रश्‍नाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.

मानवी मूल्ये पायदळी
समन्वयक शिवाजी इबितदार म्हणाले, शहराच्या विकासाला घर बचाव संघर्ष समितीचा विरोध नाही.नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन न करता पर्यायी मार्गाने रिंग रोड वळविल्यास हजारो नागरिकांची घरे वाचवता येऊ शकतील.हजारो पक्की घरे पाडून विकासाच्या गप्पा मारणे हे राजकीय आणि लोकशाही व्यवस्थेला शोभणारे नाही. नागरिकांच्या कररूपी पैशाचा विनियोग योग्य आणि आवश्यक प्रकल्पाना होणे जास्त आवश्यक आहे. गोरगरिबांच्या प्राणाची आहुती देऊन शहराचा विकास करणे म्हणजे मानवी मूल्यांना पायदळी तुडवल्यासारखेच आहे.

यांनी केले संयोजन
समन्वयक रेखा भोळे, अमर आदियाल,निकिता पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोपरा सभेचे नियोजन राजू गायकवाड, सचिन पोखरकर, आनंद सुर्यवंशी, पार्वती पोखरकर, गौशिया शेख, सुनंदा नायकोडी, प्रसाद काणेकर, संदेश नायकोडी, संदिप साळवी, सचिन साळवी, पी. संगोवार यांनी केले.