माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर विधानपरिषद सदस्यत्वाचा ही राजीनामा दिला.या जागेसाठी होणार्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने उद्योगपती प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे.हे लाड पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अजितदादा पवार यांचे लाडके होते,असे म्हणतात.त्यामुळेच त्यांना मुंबई घरदुरुस्ती मंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने दिले होते.निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांना ऑफर ही दिली होती.वडाला या मतदारसंघातून उमेदवारीही देऊ केली होती पण येथून आपण निवडून येणार नाही या भीतीने त्यांनी प्रवेश घेतला नाही.मात्र येथून भाजप उमेदवार कॅ.तमिळ सेल्वम निवडून येताच त्यांना पश्चाताप झाला.मग भाजप सत्तेवर येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे त्यांचे घरदुरुस्ती मंडळाचे अध्यक्षपद पुढे सुरू राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीमुळेच प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे.
राज्यसभा निवडणूक असो कि विधानसभा नेहमी शायना एन.सी. यांचे नाव भाजपतर्फे माध्यमांमध्ये चालवले जाते पण त्यांना कधीच उमेदवारी मिळत नाही. मात्र, याव्यतिरिक्त भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि बाळ माने यांचेही नाव चर्चेत होते, पण सर्व निष्ठावंत मंडळींना डावलून भाजपने हम भी काँग्रेससे कम नहीं हे दाखवून दिले. भाजपने नारायण राणे यांना पक्ष स्थापन करण्यास लावला. विधानपरिषदेचा राजीनामा देण्यास सांगितले आणि ऐनवेळी उमेदवारी मात्र प्रसाद लाड यांना दिली.आता नारायण राणे यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहण्यास सांगितले आहे. शिवसेना आणि काँग्रेस संपविण्यास निघालेले राणे विधानपरिषदेत जाण्यासाठी धडपडत आहेत. राणे यांना उमेदवारी दिली असती तर शिवसेनेने राणेंना पाडण्याचा निर्धार केला होता.काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राणे नकोच होते.त्यामुळे सुंठेवाचून खोकला गेला. नारायण राणे भाजपने तिकीट नाकारल्यानंतर आता वल्गना करत आहेत की मी उमेदवार असतो, तर शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटली असती.मग या नारायण राणे यांच्या लॉजिकवर भाजपने विश्वास ठेवला नाही असे म्हणायला हवे. मग राणे यांना भाजपने फसवले का? याचे उत्तर नारायण राणेच देऊ शकतील. पण नारायण यांचा एनडीएमध्ये झालेला प्रवेश हा राणे यांच्या अटीवर झालेला नसून भाजपच्या अटीवर झालेला आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय सध्यातरी राणेंकडे नाही.
प्रसाद लाड यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताना डावलले अशी चर्चा करणे निष्फळ आहे. यापूर्वी मुंबई बँक घोटाळ्याचा कथित सूत्रधार प्रवीण दरेकर यांना भाजपने विधानपरिषदेत निवडून आणले.मागठाणे या मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर उभे होते. ते पराभूत झालेच पण ते तीन नंबरवर फेकले गेले.तरी त्यांना भाजपने पावन करून घेतले आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष बनवले. पुढे विधानपरिषद ही दरेकर यांना मिळाली. उत्तर भारतीय महासंघ ही उत्तर भारतीयांची संघटना कार्यरत आहे. पूर्वी ही संघटना काँग्रेस सोबत होती. या महासंघाचे सर्वेसर्वा आर.एन. सिंग यांना तर दिल्लीच्या शिफारसीने उमेदवारी मिळाली. यांच्या मुलाने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली तरीसुद्धा भाजपने त्यांना विधानपरिषद दिली. त्यांच्या उमेदवारीपुढे मुख्यमंत्रीही हतबल होते. त्यामुळे निष्ठावंत वगैरे ही संज्ञा बदलणार्या भाजपमध्ये राहिलेली नाही. मात्र लाड यांच्या उमेदवारीने नवा प्रघात पडला आहे.यापूर्वी सर्व पक्ष निधीसाठी राज्यसभेची एखाद्या उद्योगपतीला देत. राजकुमार धूत, अजय संचेती हे सध्या आहेतच पण आता विधानपरिषदेतही उद्योगपतींना उमेदवारी देण्याची परंपरा भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी फक्त पक्ष संघटना वाढवायची.पक्षाशी निष्ठा ठेवायची. उमेदवारी कुणाला मिळणार हे मात्र पक्ष ठरवणार.
प्रसाद लाड यांच्या उमेदवारीला शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची डोकेदुखी कमी झाली आहे कारण नारायण राणेंना उमेदवारी दिली असती तर निवडून आल्यानंतर मी स्वबळावर निवडून आलो, अशी शेखी त्यांनी मिरवली असती आणि पडले असते तर मुख्यमंत्र्यांनी पडले असा आरोप झाला असता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तूर्त निःश्वास टाकला आहे.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124