प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडावी

0

अरुण खोरे यांचे प्रतिपादन : संविधान जागर सप्ताहात मार्गदर्शन

पुणे : प्रसारमाध्यमांकडे विचार स्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केले. माध्यमांचे व्यापारीकरण होत असताना मूल्ये जपणारी माध्यमे आपले वेगळेपण टिकवून आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीतर्फे आयोजित संविधान जागर सप्ताहात ’भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावरील संविधान कट्ट्यावर ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात झालेल्या या कट्ट्यावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, धर्मराज निमसरकर, परशुराम वाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ठामपणे भूमिका मांडा

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा खांब असे म्हटले जात असले, तरी त्याला संविधानिक आधार नाही. सध्या माध्यमे मालकांच्या हाती असल्याने आर्थिक शक्तींचा विळखा पडल्याचे चित्र दिसते. मात्र, पत्रकारांनी ठामपणे भूमिका घेत सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच लोकांच्या हिताचे लेखन करण्यासह विरोधकांची भूमिका निभावता आली पाहिजे. परंतु हे करताना मूल्ये सोडून काम करू नये, असे अरुण खोरे यांनी पुढे सांगितले.

प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण

सोशल मीडियामुळे प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. अनेक माध्यमसमूह उद्योजकांच्या हाती असल्याने वेगळी भूमिका मांडता येत नाही. नागरिकांचा अंकुश प्रसारमाध्यांवर राहिला, तर त्यांना तटस्थपणे भूमिका मांडावी लागेल. संविधानाला अनुसरून पत्रकारांनी भूमिका मांडायला हवी. व्यक्तिसापेक्ष विरोधापेक्षा मूल्यांवर आधारित भूमिकेला आपण महत्त्व दिले पाहिजे, असे संजय आवटे यांनी सांगितले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. धर्मराज निमसरकर यांनी सूत्रसंचालन तर शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.