प्रसिद्ध मॉडेल सोनिका चौहानचे कोलकात्यात अपघाती निधन

0

कोलकाता । प्रसिद्ध अँकर आणि मॉडेल सोनिका चौहानचे अपघाती निधन झाले आहे. मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे वळलेली सोनिका केवळ 28 वर्षांची होती. कोलकाताच्या लेक मॉलजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सोनिका चौहानचे निधन झाले आहे.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दक्षिण कोलकातामधील लेक मॉलजवळ ही दुर्घटना घडली आहे. बंगाली अभिनेता विक्रम चॅटर्जी आणि सोनिका कारने एकत्र प्रवास करत होते. यावेळी विक्रमचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. अपघातानंतर स्थानिकांनी विक्रम, सोनिकाला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी विक्रम स्वतः कार चालवत होता. रासबेहाही अ‍ॅव्हेन्युजवळ त्यांच्या टोयोटा कोरोला कारने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक देऊन गाडी फुटपाथवर चढली. यानंतर स्थानिकांनी दोघांनाही गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले. विक्रमच्या डोक्याला मार लागला असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून वेगमर्यादा ओलांडल्याने हा अपघात झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.