देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात जननी शिशू सुरक्षा योजना; मासिक बैठकीत विषय मंजूर
देहूरोड । देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात यापुढे जननी शिशु सुरक्षा योजना लागू होणार आहे. या योजनेंर्गत प्रसुतीसाठी येणार्या महिलांना मोफत रुग्णवाहिका आणि प्रसव उपचार देण्यात येणार आहेत. बोर्डाच्या मासिक बैठकीत हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुविर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू आदी यावेळी उपस्थित होते.
बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजित इमारतीचा आराखडा तयार करण्यासाठी खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याला तीन संस्थांनी प्रतिसाद दिला असून बैठकीपुर्वी या तिन्ही संस्थांनी आपापले प्रस्ताव सादर केले. नंतर प्रमुख बैठकीचे कामकाज सुरू झाले. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रुग्णालयांची मुंबई नर्सिंग होम नोंदणी कायद्यानुसार नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी बोर्डाने काही निकष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर शेलार आणि खंडेलवाल यांनी काही शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर ही योजना लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भाजी मंडईतील गाळे धोकादायक
भाजी मंडई परिसरात जुने व्यापारी गाळे असून या गाळ्यांची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे येथील व्यवसायिकांना गाळे खाली करण्याबाबत येथील सूचनापत्रे देण्यात आली होती. मात्र, पंधरा दिवसांची मुदत उलटूनही व्यापार्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. या मुद्यावर चर्चा झाली.
इमारतीचे सरकारी संस्थेमार्फत स्ट्रक्चर ऑडट झाले असून ती धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ही इमारत पाडावीच लागणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सूचविले. यासाठी कायदेसल्लागारांचे मत प्राप्त झाले असून लवकरच याबाबत कार्यवाही होणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
तंतरपाळे यांची नाराजी; अध्यक्षांच्या कानपिचक्या
बैठकीच्या अखेरीस बोर्ड सदस्य गोपाल तंतरपाळे यांनी नऊ मुद्दे मांडले. यातील बहुतांश मुद्दे लोकहिताचे असल्याने त्यावर दखल घेण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या. मात्र, या संभाषणा दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सानप आणि तंतरपाळे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी रंगली. याची ब्रिगेडीयर वैष्णव यांनी गंभीर दखल घेतली. सर्व सदस्यांची मते मांडून झाल्यावर त्यांनी सदस्यांना चांगलेच फैलावर घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरकारी सेवक आहेत. त्यांच्या पदाचा आदर करा, तुम्हालाही आदर मिळेल.
आवाज चढवून कोणी अधिकार्यांशी हुज्जत घालणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी सर्वांनाच कानपिचक्या दिल्या.
बैठकीतील ठळक निर्णय
बोर्डाच्या विविध शासकिय मालमत्तांच्या सुरक्षेसाठी 16 लाख मंजूर, डॉ. आंबेडकर रुग्णालयात तात्पुरते शल्यविशारद आणि भूलतज्ज्ञांची नियुक्ती करणे,राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची नियुक्ती करणे, जुन्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री करून नवीन वाहने खरेदी करणे. त्यासाठी 77 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, आदी विविध कामे या बैठकीत मंजूर करण्यात आली.