प्रस्थान सोहळ्यात भाविकांची गैरसोय टाळावी

0

खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांच्या सूचना

आळंदी : अलंकापुरीतून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. सोहळ्याच्या कालावधीत भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिक यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. विविध सेवा-सुविधा प्रभावी पणे कशा मिळतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी केल्या. आळंदीतील प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी आयोजित आढावा बैठक प्रांत प्रसाद यांचे प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी संवाद साधत त्यांनी प्रशासनास सूचना करताना ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी प्रमुख विश्‍वस्त डॉ.अजित कुलकर्णी, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, पारुबाई तापकीर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, बी.डी.ओ.इंदिरा अस्वर, शासकीय खात्याचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पास नसल्यास प्रवेश नाही
या सोहळ्यातील आळंदी मुक्कामात राज्यासह परिसरातून आलेल्या भाविकांसह नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठी प्रांत प्रसाद यांनी उपस्थित अधिकारी, प्रतिनिधी यांचे कडून नियोजनाची माहिती करून घेतली. प्रांत प्रसाद यांनी सांगितले की, विविध शासकीय खात्यांनी जाहीर केलेल्या नियोजनावर कार्यवाही करून यात्रा कालावधीत भाविकांची सोय करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. पालखी प्रस्थान कालावधीत भाविकांचे सुरक्षेशी प्राधान्य देण्यासाठी जाहीर केलेल्या नियोजनात मोठा पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, नागरी सेवा सुविधा, स्वच्छता वीज, पाणी-पुरवठा अखंडित राहिल याची काळजी घेतली पाहिजे. शहरात रुग्णवाहिका आणि अग्निसुरक्षेची वाहने, पाण्याचे टँकर, सेवा वाहने यांना प्रवेश मिळणार आहे. ज्या वाहनांच्या पार्किंगची सोय आहे, अशाच वाहनांना प्रस्थान पूर्वी शहरात प्रवेश दिला जाणार आहे. वाहन प्रवेश पास नसेल तर वाहनांना प्रवेश दिले जाणार नाही.

भारनियमन होणार नाही
प्रांत प्रसाद पुढे म्हणाले की, आळंदीत प्रस्थान काळात भारनियमन होणार नाही याची दक्षता वीज महावितरणने घेण्यास सांगितले आहे. इंधन गॅस आणि केरोसिन पुरवठा सुरळलीत राहील याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्यास आदेश देण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थ तपासणी, पाणी नमुने तपासणी,फिरते विक्रेते अतिक्रमण करणार नाही याची काळजी घेण्याचे सूचना आळंदी नगरपरिषद प्रशासनास देण्यात आल्या आहेत. यावेळी शहरातील सर्व अतिक्रमणे काढून रस्ते रहदारीला खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी पथक कामकाज करणार आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी सांगितले की, भाविकांसह मंदिर परिसरातील सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आळंदी नगरपरिषद, आळंदी संस्थान, पुणे शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वीज महावितरण, एस.टी.महामंडळ वाहतूक सेवा, पीएमपीएमएल वाहतूक सेवा, राज्य आरोग्य सेवा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींचे प्रतिनिधी सुरळीत नियोजनास संवाद ठेवत नियोजन मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून करणार आहेत. इंद्रायणी नदी घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांसह नागरिकांना मारहाण करून चोरीच्या घटना घडल्याने नदीचे दुतर्फा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी या बैठकीत पदाधिकार्‍यांनी केली. याशिवाय येथील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत होत असल्याने वीज पुरवठ्यावर नगरसेविका रायकर, रंधवे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सामाजिक कार्यकर्ते मल्हार काळे आदींनी बैठकीत भाविकांची नदी घाटावरील सुरक्षा आणि वीज पुरवठ्याचे विषयावर आवाज उठविला.

अंतिम आढावा 26 जूनच्या बैठकीत
यावर प्रांत प्रसाद यांनी येथील येथील सुरक्षा राम भरोसे रहाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचना दिल्या. नदी घाटावर होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त आणि सी.सी.टी.व्ही. यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आळंदी मंदिर देवस्थानचे माजी प्रमुख विश्‍वस्त अजित कुलकर्णी यांनी देखील इंद्रायणी नदीवरील सुरक्षेची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. या नियोजनपूर्व आढावा बैठकीत भाविकांची सुरक्षा, सुरळलीत वाहतूक, पास वाटप, वीज, पाणी, आरोग्य सेवा, इंधन पुरवठा, प्रवासी वाहतूक सेवा, वाहनतळ व्यवस्था, वाहन प्रवेश व्यवस्था आदींवर चर्चा करण्यात आली. केलेल्या नियोजनाप्रमाणे कामकाज झाल्याबाबतचा अंतिम आढावा 26 जूनला होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार आहे.

अतिक्रमण कारवाई करण्याच्या सूचना
मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले की, आळंदीत प्रस्थान काळात भाविकांना नियमित नागरी सुविधा मिळतील याची ग्वाही दिली. यात नियमित पाणी पुरवठा, स्वच्छता, स्वच्छता गृहांची सोय, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण, पाणी टँकरची सेवा, संवाद यंत्रणा, शहरात विद्युत पुरवठा प्रकाशझोत यंत्रणा, मध्यवर्ती नियंत्रण कक्षा निर्मिती तसेच अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे. विविध उपाय योजनांचे माध्यमातून नागरिक आणि भाविक यांचे साठी आळंदीत सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत अतिक्रमण कारवाईत कोणाला पाठीशी घालू नका. कोणावर कारवाईत अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन नियमाप्रमाणे अतिक्रमण कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे अतिक्रमण आहे, ते तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. प्रस्थान काळात सर्वांची मदत घ्या. यात पोलीस मित्र, पोलीस पाटील, आशा वर्कर आदींनादेखील सहभागी करून घेण्यास त्यांनी सुचविले.