प्रहार प्रशासन व दिव्यांगांमधील दुवा

0

पुणे । प्रशासन व दिव्यांगांमधील अंतर भरून काढण्याचे काम प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना करीत आहे. त्यामुळे प्रशासन आणि अपंग यातील महत्वाचा दुवा ही संघटना असल्याचे गौरवोद्गार अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी काढले. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, नंदकुमार फुले, रामदास म्हात्रे, कल्पना गुरव, जयश्री आदक, सुनील शिंदे, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे उपस्थित होते.

समाज कल्याण विभागात कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. मात्र, दिव्यांगांचे हित साधायचे असेल, तर निर्भय राहावे लागेल. तसेच, कामाचा व्याप मोठा आहे़ त्यातच अपंगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च होताना दिसत नाही. अशा अडचणींचा सामना करावा लागत असतानाच प्रशासन आणि दिव्यांगांमधील अंतर भरून काढण्याचे काम अपंग प्रहार क्रांती आंदोलन करीत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

सर्व निधी खर्च
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपंगांची नोंदणी झाली असून, त्यांच्यासाठी राखीव असणारा तीन टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. सर्व पंचायत समिती, गटविकास अधिकारी व प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन अधिकार्‍यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
– दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद