भुसावळ- प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या पावणेदोन वर्षीय चिमुकला ओजसच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने शुक्रवारी एका सुपरवायझरला अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
तिघांविरुद्ध गुन्हा : सुपरवायझरला अटक
17 मार्च ही दुर्दैवी घटना घडली होती तर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या तक्रारीनंतर रेल्वेचे कंत्राटदार जयप्रकाश सुरजभान अग्रवाल (65), त्यांचा मुलगा तथा सुपरवायझर प्रवीण जयप्रकाश अग्रवाल व रेल्वेचे सुपर वायझर सुभाषचंद्र अयोध्याप्रसाद शर्मा (52) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा व चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि 304 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. शुक्रवारी संशयीत आरोपी तथा सुपरवायझर प्रवीण जयप्रकाश अग्रवाल यास शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले करीत आहेत.