प्रांताधिकार्‍याची कार्यवाही मात्र अवैध उपसा सुरूच

0

जळगाव। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवैधपणे होणारा वाळू उपसा आणि वाळूची होणारी वाहतूक बिनधास्तपणे केली जात आहे. नदीपात्रातून करण्यात येणार्‍या अवैध वाळू उपश्यामुळे खड्डे तयार होऊन पावसाळ्यात हेच खड्डे मृत्यूचे बनले आहे. पावसाळा तोडावर असताना मात्र रेती उपसा सुरु आहे गेल्या दोनवर्षापूर्वी वैजनाथ गावाजवळच्या गिरणा नदी पात्रात एका खड्डयात बुडून तरुणाचा मृत्यू झाला होता. वाळू उपशाचा ठेका प्रशासनाकडून देण्यात येतो मात्र ठेकेदारांकडून अटी-शर्तीचे भंग करून प्रमाणापेक्षा अधिक वाळू काढण्यात येत आहे. तालुका पोलिसात तसेच जळगाव प्रांतअधिकारी जलद शर्मा यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर केलेली कार्यवाही रेती वाहतूक करणार्‍याच्या जिव्हारी आली आहे. मात्र दुसरी कडे वैध वाळू वाहतूक करणार्‍या विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वाळूवाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. जो पर्यत न्याय मिळणार नाही.तो पर्यत लढा सुरु ठेवण्याचा पवित्रा वैध वाळू वाहतूक करणार्‍या विक्रेत्यांनी घेतला आहे.

वाळू वाहतूक संघटनांनी पकडले वाहने
22 मे सोमवार रोजी दोन डंपर तर 24 बुधवार रोजी वाळू संघटनानी अवैध वाळूची वाहने पकडून दिल्याने जिल्हा प्रशासन खबडून जागे झाले आहे. जळगाव जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर गेल्या दोन दिवसा पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणार्‍यावर कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे. परवाने असताना वैध रित्या वाळूवाहतूक करणार्‍यावर महसूल प्रशासन वाहने जप्ती करून कार्यवाही करीत असून कायद्याच्या विरोधात वागणार्‍या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात याची. आमच्या कडे परवाने असताना वाळू वाहतूक करू दिले जात नसल्याच आरोप वाळू वाहतूक संघटनेने केला आहे. याबाबत प्रशानाने आम्हाला तत्काळ न्याय दिल्यास आमच्या उपजीविकेची समस्या सुटणार आहे. व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीची वेळ वाल्याचे संघटनेच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

रोज होते शेकडोंची वाहतूक
जळगाव ग्रामीण मधील सर्वच गिरणा आणि तापी नदी पत्रात तसेच तालुक्यातून रोज शेकडो वाळू वाहतुक अनधिकृतपणे सुरू आहे. अवैध मोकाटपणे सुरू असलेल्या या वाळू वाहतुकीस मागील आठवडयातील कारवाईमुळे वाळू तस्करी करणार्‍या माफियामध्ये खळबळ माजली होती. अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात 25 ते 30 डंपरविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. महसूल विभाग तसेच प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकाने ही कार्यवाही केली असली तरी जिल्ह्यातील तालुका स्तरावर प्रशासन अधिकार्री बघ्याची भूमिका घेतल्याने हा चर्चेचा विषय झाला. विशेष म्हणजे पकडलेल्या डंपरविरोधात कार्यवाही पूर्ण होत नाही तोच पुन्हा वाळू वाहतूक सुरू झाली आहे.

डंपरप्रमाणे ट्रॅक्टर ट्रॉलीवरही कारवाई करावी
रस्त्यावरील वाळू वाहतूक करणारे डंपर पूर्णपणे भरलेले असते. हे डंपर अतिशय जिवघेणे ठरत आहेत. एप्रिल महिन्यात वाळूच्या डंपरने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. तसेच खोटे नगर जवळील निमखेडी शिवार याठिकाणी चिमुकले खेळत असताना या अपघातात डंपरखाली येऊन प्राण गेल्याने संतप्त नागरिकांनी वाहनाला पेटून दिले यावेळी संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. एका चिमुकल्याचे प्राण गेल्याने हा अपघात विशेष चर्चेत राहिला. वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांमधील वाळू वार्‍याने उडून मागून येणार्‍या वाहन चालकांच्या डोळ्यात वाळूचे कण जाऊन अपघात होण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणार्‍या डंपरच्या अपघातात कोणाचे प्राण गेले तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रशासनावर दाखल करावा का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैधपणे होणार्‍या वाळू वाहतुकीचा प्रश्न केवळ डंपरशी संबंधित आहे असे नाही तर ट्रॅक्टर ट्रॉली मधून देखील रात्रभर कायदा धाब्यावर बसवीत वाळू वाहतूक केली जाते. तापी आणि गिरणा ह्या जिल्ह्यातील मुख्य नद्या आहेत. यांची केंद्राच्या वतीने राष्ट्रीय जलमार्ग म्हणून देखील नोंद करण्यात आली या प्रकाराकडे संबधित विभागाच्या पोलीस प्रशासनाचे लागेबांधे असल्याने दुर्लक्ष करण्यात येते. महसूल विभागाने गेल्या आठवड्यात कार्यवाही केली मात्र त्याच्या आगोदर डोळे बंद केल्याने अशा प्रकारे रेती तस्करांना प्रोत्साहन मिळत गेले. डंपरविरोधात मागील आठवडयात करण्यात आली. मात्र कायद्यानुसार ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू वाहतूक करणार्‍या गुन्हेगारांवर कार्यवाही होण्याची गरज आहे. जिल्ह्यात अनेक तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी अशा अधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले आहे. याकरिता अवैध वाळू वाहतुक करणार्‍यांच्या मुसक्या आवरण्याची गरज असल्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

नदीपात्रे धोकादायक
नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीपात्रेही धोकादायक झाली आहेत. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या खड्डयांमुळे नदीपात्राचे विद्रूपीकरण झाले आहे. पावसाळ्यात वाहती असणारी गिरणा नदी उन्हाळ्यात कोरडीठाक होते. नदीपात्रात डांगर शेती केली जात असे. परंतु, अलीकडे वाळू उपशासाठी नदीपात्राचा उपयोग करण्यात येत असल्याने डांगराचे उत्पादन लावण्याचे प्रमाण अतीशय कमी झाले आहे. यामुळे उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून नदीपात्र आज खड्डेमय झाले आहे. गेल्या काळात भुसावळ तालुक्यात नदीला आलेल्या पाण्यातून वाट काढणार्‍या शेतकर्‍याचा नदीपात्रातील खड्डयात अडकून मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील इतरही ठिकाणी अशा प्रकारचे काही अपघात झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.