प्रांताध्यक्षांना जिल्ह्याने घडविली ‘परिवार वाद’ यात्रा

0

चेतन साखरे, जळगाव: मुंबई, औरंगाबाद महापालिका, सहकार क्षेत्रातील आगामी काळात होणार्‍या निवडणूका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत राज्यभरातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन पक्ष संघटनेचा आढावा घेत मजबुतीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले आहे. गडचिरोलीहून सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या पर्वाचा समारोप काल जळगाव जिल्ह्यात झाला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याचा अनुभव हा प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्यासाठी
मात्र फारसा चांगला राहिला नाही. कारण या परिवार संवाद यात्रेत संवाद कमी आणि वादच अधिक झाले. आणि नुसतेच झाले नाही तर चक्क प्रांताध्यक्षांसमोर ते झाले.

जळगाव जिल्ह्याच्या परिवार संवाद यात्रेला गालबोट लागले ते धुळ्यापासूनच. धुळे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचेच दोन गट आमनेसामने भिडले. त्यातून कसेबसे बाहेर पडत नाही तोच जळगाव जिल्ह्यातही थोडा वेगळा कित्ता याठिकाणी गिरवला गेला. चाळीसगावपासून जळगाव जिल्ह्याच्या परिवार संवाद यात्रेला सुरूवात झाली. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर, फैजपूर, जामनेर, असे दौरे करत प्रांताध्यक्षांची यात्रा
भुसावळात पोहोचली.

सोनवणेंनी भुसावळात अडविली यात्रा
भुसावळ हा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भुसावळातील नावालाच असलेले भाजपाचे नगरसेवकांनी खडसेंच्या
मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. भुसावळात तसे बघितले तर माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथराव खडसे असे राष्ट्रवादीचे आता दोन गट आहेत. यात मात्र खडसे गटाला प्रदेशस्तरावरून अधिक झुकते माप आहे. असो, जयंत पाटील यांची यात्रा भुसावळात पोहोचताच माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधाच्या घोषणा देत पीरिपाचे जगन सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी वाहनाच्या ताफ्यासमोर झोपून यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला.

जळगावात फोटोवरून मानापमान नाट्य
प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनर अन् होर्डींग्ज लावण्यात आले होते. यात वादग्रस्त ठरले ते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे बॅनर. देवकरांच्या बॅनरवर नव्यानेच पक्षात आलेल्या एकनाथराव खडसेंचा फोटो नसल्याचे गहजब करण्यात आले. प्रत्यक्षात त्या बॅनरवर प्रदेशस्तरीय वगळता जिल्ह्यातील एकाही नेत्याचा फोटो नव्हता. पण वाद व्हायचाच होता तो झालाच. अखेर रातोरात देवकरांनी ते बॅनर बदलवुन जिल्ह्यातील नेत्यांचेही फोटो असलेले नविन बॅनर लावले. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. लेवा भवन येथे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. याठिकाणी व्यासपीठावरील बॅनरवर ‘आमचा फोटो नाही’ असे म्हणत राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी चक्क प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाद घातला. त्याला गुलाबराव देवकरांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे प्रांताध्यक्षांसमोरच पुन्हा एकदा परिवारातील वाद उफाळुन आला.

मेळावा महानगराचा कि परिवाराचा
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा मेळावा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आयोजीत करण्यात आला होता.
महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी त्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्या मर्जीतील पदाधिकारीच दिसून आले. शहरातील बहुतांश पदाधिकार्‍यांनी अनुपस्थिती दिल्याचे प्रांताध्यक्षांनी घेतलेल्या हजेरीवरून दिसून आले. याठिकाणीही परिवार विखुरलेला दिसून आला. एकूणच राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्यासाठी जळगाव जिल्ह्याने संवाद तर दूरच पण ‘परिवार वाद’ यात्रा कशी असते हे नक्कीच दाखवुन दिले.