बीड । प्राचार्यानेच विद्यार्थिनीचें लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयातील राणा डोईफोडे असं या प्राचार्याचे नाव आहे. डोईफोडेवर लैंगिक शोषणाचा आरोप 4 विद्यार्थिंनींनी केला आहे. पोलिसांनी डोईफोडेला ताब्यात घेतल्यानंतरही संतप्त विद्यार्थिनींनी गाडी अडवून डोईफोडेला गाडीबाहेर काढून त्याला बेदम मारहाण केली. डोईफोडेवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगले मार्क मिळवायचे असतील किंवा प्रॅक्टीकलमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर मी म्हणेल तसे करा, नाहीतर परिणामास सामोरे जा, असा दम प्राचार्य डोईफोडे देतो. त्याच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी 12 विद्यार्थिनी बीड ग्रामीण ठाण्यात रात्री आठ वाजेपर्यंत ठाण मांडून होत्या. प्राचार्याच्या या ‘ब्लॅकमेलिंग’ने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राचार्य डोईफोडेचे राजकारणातील हितसंबंध मोठे असल्याचे भासवत तो आपल्यावर कोणीच कारवाई करु शकत नसल्याचा आव आणतो. त्याच्या अशा भपकेबाजीला पालकांनी भीक घालू नये असे आवाहन काही सामाजिक संघटनांनी केले आहे.
तक्रारी करुनही दडपशाही
बीडच्या जालना रोडवर विठाई हॉस्पिटल व नर्सिंग महाविद्यालय असून बाजूलाच विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. या महाविद्यालयात भाजपच्या पाली जि.प. गटाच्या सदस्या सारिका डोईफोडे यांचे पती राणा डोईफोडेे प्राचार्य आहेत. काही दिवसांपासून महाविद्यालयातील वातावरण वेगळ्याच कारणाने चर्चिले जात होते. विद्यार्थिनींशी प्राचार्य अश्लील वर्तन करतो व त्यांना उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींचा पाढा विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनापुढे वाचला होता. परंतु प्रशासनाने डोईफोडे यांना पाठीशी घालत आम्हालाच दम दिला, असा आरोप विद्यार्थिनींनी केला.
राजकीय दडपशाहीला प्रत्युत्तराची तयारी
प्राचार्य डोईफोडे हा त्याचा राजकीय प्रभाव मोठे असल्याचे दाखवत असला तरी, पोलिसांनी त्याला त्याची जागा दाखवावी. कोणत्याही दबावाला बळी पडू नये. पोलिसांनी जनमताचा रेटा लक्षात घेवून या प्रकरणात भुमिका घ्यावी त्यासाठी गरज पडल्यास पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्यांवर दबाव वाढविण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्याच्या तयारीत जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आहेत. या गुन्ह्यात काही विघ्नसंतोषी लोक विनाकारण जातिपातीच्या राजकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न करतांना दिसले तरी कोणत्याही अनाठायी थापांना बळी न पडता पालकांनी कायद्याच्या आधारावर कठोर भुमिका घेवून पोलिसांना कारवाईस भाग पाडावे. असे या सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
तक्रारींचा पाढा वाचला
चांगल्या गुणाने पास व्हायचे असेल तर तर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा, असे डोईफोडे आम्हाला धमकावत असल्याचेही या विद्यार्थिनींनी सांगितले. डोईफोडेंबद्दल अनेक तक्रारींचा पाढा या विद्यार्थिनींनी पोलिसांसह जमलेल्या नागरिकांसमोर वाचून दाखविला. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जाहीरपणे विद्यार्थीनी बोलल्यानंतर माध्यमांनी गांर्भियाने या प्रकरणाची दखल घ्यायला हवी असे त्या म्हणाल्या.