पियुष नरेंद्र पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती ; देशमुखांचा महाविद्यालयात विद्यार्थ्याना टीसी देण्याच्या बदल्यात लाखोंचा गफला
जळगाव ;- नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्राचार्यानी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप करून मला गुंड म्हणून संबोधले असून त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे . तसेच 10 रोजी प्राचार्यांसह कर्मचार्यांनी आंदोलन केले त्यावेळेस महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीत सुरु होते . त्यामुळे त्यांच्याकडून राष्टगीताचा अवमान झाला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. मला गुंड म्हणणार्या प्राचार्य देशमुख यांच्यावर वरणगाव कॉलेजात एल.पी. देशमुखांविरुद्ध अडीच कोटींचा संगणक अपहाराचा गुन्हा दाखल असून नूतन मराठा महाविद्यालयातही त्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला असून त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी माहिती पियुष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशमुख यांना घरी बसविल्याशिवाय संघर्ष सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्राचार्यांचे वर्षभरापूर्वी माझ्याबद्दल गौरवोद्गार कसे?
यावेळी बोलताना पियुष पाटील म्हणाले कि नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एलपी देशमुख यांनी माझ्यावर बेछूट आरोप केले असून यात काहीही तथ्य नाही . मी जर गुंड , मुलींची छेडछाड करणारा असतो तर इतक्या वर्षात माझ्याविरुद्ध एकही तक्रार का आली नाही. तसेच मला विद्यार्थ्यानी महाविद्यालयीन सचिव म्हणून निवडून दिले होते , त्यावेळेस प्राचार्य देशमुख यांनी गौरवोद्गार काढत पियुष हा सर्वाना सोबत घेऊन चालणारा विद्यार्थी आहे. त्याचे काम सर्वाना आवडते असे त्यावेळेस तें म्हणाले होते . मग अचानक इतक्या दिवसांनंतर मला गुंड संबोधून एकप्रकारे माझ्या बदनामीची सुपारी घेतली आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पियुष पाटील यांनी सांगितले.
प्राचार्यांच्या संपत्तीशी चौकशी करा
आंदोलनाच्या वेळेस काही प्राध्यापक , शिक्षक आणि कर्मचार्यांना त्यांची इच्छा नसतानाही कामबंद आंदोलनासाठी दडपण आणून आंदोलनासाठी उभे केल्याचा दावा पियुष पाटील यांनी केला. तसेच महाविद्यालया प्राचार्य देशमुख यांनी काही दलालांना हाताशी धरून 5 ते 10 हजारांमध्ये तडजोड करून टीसी दिले असून यातही लाखोंचा घोटाळा असून प्राचार्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल होणार आहे असे पियुष पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या वरणगाव कॉलेजमध्ये प्रशासक नियुक्त असताना प्राचार्य एलपी देशमुख यांनी संगणक व स्टेशनरी खरेदी प्रकरणाची लाखो रुपयांची बनावट बिले करून अपहार केल्याचा आरोप पियुष पाटील यांनी केला.
भितीपोटी घेतली पत्रकार परिषद- पुण्यप्रताप पाटील
अन्याय, अत्याचार तसेच परिक्षेदरम्यान चालविले जाणारे कॉपी रॅकेट या विषयी विद्यार्थी विद्यार्थीनी मोहिम उघडणार असल्याने या भितीपोटी विद्यार्थी , विद्याथीर्नीवर दबाव यावा या दृष्टीने पियुष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतल्याचाही आरोप नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रातप यांनी केला आहे. याबाबतचे स्वाक्षरीचे पत्र प्रसिध्दीसाठी दिले आहे.