पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासनाने मृत पावलेले पाळीव प्राणी तसेच रस्त्यावर बेवारसपणे फिरणार्या मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत शवदाहिनी उभारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. पाळीव प्राणी तसेच रस्त्यावर बेवारसपणे जगणारे प्राणी मेले की, त्यांची विल्हेवाट कशी लावायची ही मोठी समस्या असते. पाळीव प्राणी मृत पावला की, अनेक जण घराच्या आवारात किंवा मोकळ्या जागेत त्याचे दफन करतात. मात्र, बेवारस प्राणी मृत पावले की, त्यांना उघड्यावर कोठेही टाकून दिले जाते. नंतर त्या प्राण्याचे मृत शरीर कुजून दुर्गंधी पसरते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. मात्र, विद्युत शवदाहिनीमुळे ही समस्या सुटू शकते, असे खैरनार यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुंबई पुण्याप्रमाणे निर्णय घ्यावा
शहरात ठिकठिकाणी मृत पावणार्या प्राण्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खास विद्युत शवदाहिनी उभारली जाणे गरजेचे आहे. शहरात पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावली जात नाही. त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही व्यवस्था नसल्याकारणाने प्राण्यांचे मृतदेह जमिनीत पुरल्यामुळे भटक्या कुत्र्यांमार्फत ते पुन्हा उकरले जाऊ शकतात. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. मुंबईत प्राण्यांसाठी तीन ठिकाणी विद्युत शवदाहिनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पुणे महापालिकेनेही मृत पावणार्या प्राण्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी मुंढवा, केशवनगर, सर्वे क्रमांक 9 मध्ये विद्युत शवदाहिनी उभारली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अशा प्रकारची विद्युत शवदाहिनी असलेली स्मशानभूमी उभारण्यात यावी, असे खैरनार यांनी म्हटले आहे.