पुणे । पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीबरोबरच मोठा अपघात, साथीचे आजार यांची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना त्वरित मिळावी व नागरिक आणि आरोग्य विभागात संवाद साधला जाऊन नागरिकांना अपेक्षित मदत करता यावी, यासाठी पुणे विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील विभागातील प्राथमिक केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत 312 ठिकाणी कंट्रोल रूम (माहिती व नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात येणार आहेत.
कंट्रोल रूम स्थापन करण्याची संकल्पना राबविणारा पुणे आरोग्य उपसंचालक विभाग हा राज्यातील आठ आरोग्य उपसंचालक कार्यालयांमध्ये पहीला ठरला आहे. पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयातही कंट्रोल रूम एक महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. तर 5 सप्टेंबरपर्यंत इतर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी ही कंट्रोल रुम कार्यान्वित करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिल्या आहेत.
24 तास सेवा
पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयात एक महिन्याअगोदरच ही कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे, तर उरलेल्या सर्व कंट्रोल रूम या 5 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. या कंट्रोल रूमचे काम 24 तास सुरू असणार असल्याची माहिती पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. सर्वसामान्य नागरीकांना त्यांच्या परिसरातील साथीची माहीती स्थानिक कंट्रोल रुमवर देता येणार आहे. तसेच नागरीकांना काही वैद्यकीय माहिती हवी असल्यास ती देखिल कंट्रोल रुमवरद्वारे मिळू शकणार आहे.