प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधेविषयी नागरिक संतप्त
जैताणे । येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, कर्मचार्यांची मुजोरी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सोमवारी १८ रोजी पुन्हा दिसून आले. रुग्णांची गर्दी असतांना डॉक्टरांची रुग्णालयात उपस्थिती नव्हती. म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह रुग्णांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकलेे.सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने निजामपूर व पंचक्रोशीतील खेड्यापाड्यातून मोठ्याप्रमाणात रुग्ण आलेले असतात. शनिवार-रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात रुग्ण जमा झाले मात्र ११ वाजेपर्यंत डॉक्टर उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या दरवाजाला कुलूप लावले.
दुपारी उशिरा डॉक्टर आल्यानंतर त्यांना जाब विचारला असता त्यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले व माझी ड्युटी नसून देखील मी आलो असल्याचे सांगितले. महिन्याभरापूर्वी धुळे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.डी.रंगनाथन यांनी जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन असुविधा व अडचणींबाबत कर्मचार्यांची कानउघाडणी केली होती तरीदेखील कर्मचार्यांची मनमानी थांबत नसल्याचे दिसून येते. याबाबत दैनिक जनशक्तीने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.