पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणार्या रुग्णाला घरबसल्या डॉक्टरांची अपॉइमेंट घेता यावी, केंद्रात डॉक्टर उपलब्ध आहेत की, नाही यांसह अनेक अद्ययावत माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी, त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नवीन अॅप तयार करण्यात आले असून, लवकरच या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
इंटरनेटद्वारे जोडणार आरोग्य केंद्र
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग दिवसेंदिवस हायटेक होत आहे. अध्यक्ष विश्वासराव देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि आरोग्य सभापती प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे अॅप तयार केले जात आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्याचे काम सुरू असून, काही केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य केंद्रांमधील सेवा-सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन त्याप्रमाणे बदलही करण्यात आले आहे.
अॅपची निर्मिती
दरम्यान, केंद्रातील कामांमध्ये सूसुत्रता यावी, तक्रारींचा पाढा कमी व्हावा आणि रुग्णांचे हेलपाटे थांबावे यासाठी, आरोग्य विभागाने सर्व सोयी-सुविधांनी उपयुक्त असलेल्या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कोणते डॉक्टर कधी असणार, त्यांची वेळ यासह अन्य माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार असून, डॉक्टरांची अपॉईंमेंटही या अॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे. यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतील तर रेड चिन्ह असेल आणि असतील तर ग्रीन चिन्ह असेल.
रुग्णांची सर्व माहिती ऑनलाइन ठेवणार
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणार्या रुग्णांची सर्व माहिती एकत्रित करून त्याला ओपीडी नंबर देण्यात येणार आहे. ज्या-ज्या वेळी तो तपासणीसाठी केंद्रात येईल त्यावेळी त्याच्यावर कोणते उपचार झाले, त्याला डॉक्टरांनी काय सल्ला दिला, रूग्णाला काय झाले होते याची सर्व माहिती ही ऑनलाइन मिळणार आहे. रुग्णाने केवळ रजिस्टर ओपीडी नंबर दिल्यावर ही सर्व माहिती रुग्णाला आणि डॉक्टरांना पाहता येणार आहे. या अद्यायवात सुविधांबरोबर नवीन अॅपमध्ये अनेक महत्त्वांच्या बाबींचा समावेश करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.