पाटणा । लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचा निती आयोगाचा प्रस्ताव हा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. निती आयोगाच्या या प्रस्तावामुळे केवळ उच्चवर्णीयांनाच फायदा मिळणार आहे. निती आयोगाने हा निर्णय घेताना मध्यम आणि कनिष्ठ वर्गाचा विचार का केला नाही, असा सवालही लालूप्रसाद यादव यांनी केला.
2024 नंतरच्या काळासाठी शिफारस
2024 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस निती आयोगाने केली होती. त्यानुसार 2017 ते 2020 या तीन वर्षांसाठीचा अहवाल तयार केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या शिफारशीबाबत विचार करावा आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कार्यगट नेमावा, अशी सूचनाही निती आयोगाने निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
योगींवर टीका
लालू यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. उत्तर प्रदेशात एका रात्रीत विकास होईल हा समज चुकीचा आहे. उत्तर प्रदेशात राजदने पक्षांतंर्गत चांगले संघटन केले आहे. मात्र, आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारला आपण चमत्कार करू, असे वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे, अशी टीकाही लालूंनी केली.