पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर बेकायदा थांबणार्या ट्रक, कंटेनर या वाहनांवर प्राधिकरण प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई केली. तसेच, प्राधिकरणाच्या जागेत बेकायदेशीरपणे उभारलेल्या आठ टपर्याही कारवाईत हटविण्यात आल्या. शहरातील सेक्टर क्रमांक 8, 11 आणि 12 मोशी हा परिसर प्राधिकरणाच्या अखत्यारीत मोडतो. या ठिकाणी अनेक ट्रक व कंटेनर बेकायदा उभे केले जात होते. यासंदर्भात तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली.
सूचना देऊनही गांभीर्य नाही
गेल्या आठ दिवसांपासून प्राधिकरण प्रशासनाकडून वाहन चालकांना प्राधिकरणाच्या जागेवर बेकायदा वाहने पार्क करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही वाहन चालकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. शेवटी प्राधिकरणाने शुक्रवारी अनधिकृतपणे पार्क केलेल्या 150 ट्रक आणि कंटेनर तेथून हलविले आहेत. ज्या वाहनांचे चालक तिथे नव्हते; त्या वाहनांवर नोटीस चिटकविण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपअभियंता प्रभाकर वसईकर यांनी दिली. तसेच प्राधिकरणाच्या जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या आठ ते दहा टपर्याही उठविण्यात आल्या.