पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात असणारी अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी प्रशासनाकडे सविस्तर फेरप्रस्ताव सादर करावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. याबाबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना निवेदन देण्यात आले आहे.
2013 मध्ये पाठविला होता प्रस्ताव
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीमध्ये मार्च 2012 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सन 2013 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यावेळी आघाडी सरकारने ही बांधकामे अनधिकृत नसून, प्राधिकरण मालकीच्या जागेवर अतिक्रमण केलेली असल्याचे ठरवले होते. तसे सन 2013 मध्येच प्राधिकरणास कळविण्यात आले होते.
फेरप्रस्ताव देण्याची गरज
प्राधिकरण क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या भागातील जमिनीचे मूळ मालक यांच्याकडून गोरगरीब नागरिकांनी गुंठा; दोन गुंठे जागा खरेदी करून आपले घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील सन 2015 पर्यंतची बांधकामे नियमित करण्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे फेरसादर करावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. या निवेदनावर नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करुणा चिंचवडे आणि अभिषेक बारणे यांच्या स्वाक्षर्या आहेत.