प्राधिकरणाने 15 दिवसांत घरे नियमितीकरण अर्ज प्रक्रिया सुरू करावी

0

पिंपरी-चिंचवड : 7 ऑक्टोबर 2017 रोजी नगरविकास खात्याने अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र नगररचना नियम 2017कायदा प्रसिद्ध केला. त्याला आज 35 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु नियमितीकरण अर्ज प्रक्रिया अद्याप नवनगर विकास प्राधिकरणाने सुरू केलेली नाही. ती त्यांनी 15 दिवसात सुरू करणे अपेक्षित आहे, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केली.

रविवारी सायंकाळी गुरुद्वार चौक, बिजलीनगर येथे घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने नगररचना कायदा 2017 निमित्ताने जनजागृती सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये ते बोलत होते. गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील बहुसंख्य नागरिक सभेस उपस्थित होते. गेल्या 150 दिवसांपासून या उपनगरातील रिंग रोड बाधित आणि अनधिकृत घरे बाधित रहिवासी विविध उपक्रमाद्वारे सनदशीर मार्गाने हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. दिवसेंदिवस आंदोलनास पिंपरी चिंचवड शहरातील बाधित राहिवाश्यांचा मोठा पाठिंबा वाढत आहे. संघर्ष 150 च्या निमित्ताने घेतलेल्या सभेत ते दिसूनही आले. आंदोलन 150 दिवस सुरू असून महिलांचा मोठा लक्षणीय सहभाग त्यामध्ये होता.

सर्वांनीच अर्ज करणे अत्यावश्यक
समन्वयक पाटील म्हणाले, ‘एप्रिल 2018 ही अर्ज प्रणाली स्वीकारण्याची शेवटची मुदत आहे. त्याकरीता प्रत्येक रिंग रोड बाधित तसेच अनधिकृत घरे बाधित यांनी कायदेशीर आधार प्रणालीचा वापर करणे योग्य ठरेल. प्राधिकरण प्रशासनाला प्रशमित संरचना म्हणून घोषित करण्यासाठी प्रत्येक रहिवासी यांनी यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसेच महापालिका आयुक्तांना विनंती अर्ज करणे अत्यावश्यक आहे. सर्व बाधितांनी अर्ज केल्यास प्रशासनाला दखल घ्यावी लागेल. संघर्ष 150 उपक्रमामध्ये सर्व शहर 43 समन्वयक रिंग रोड तसेच अनधिकृत बाधित विभागामध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.

पुनर्सर्वेक्षण प्रणाली राबवावी
समन्वयक रेखा भोळे म्हणाल्या,गेल्या 150 दिवसांमध्ये विविध प्रकारची आंदोलने समिती राबवित आहे. प्रधासनाने पुनःसर्वेक्षण प्रणाली तात्काळ राबवून, एचसीएमटीआर रिंग रोड चेंज अलायमेंट करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना घरे नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

प्रशासनाने गंभीर विचार करावा
समन्वयक तानाजी जवळकर म्हणाले,प्राधिकरण आणि पालिका प्रशासनाच्या जाचक अटी आणि शर्थीमुळे अर्ज प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होऊ शकत नाही.महापालिका प्रशासनाने अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठीअर्ज प्रक्रिया सुरू करून महिना पूर्ण झाला तरीही एकही अर्ज पालिकेकडे अद्याप जमा नाही, यावर प्रशासनाने गंभीर विचार करणे आवश्यक आहे.

जाचक अटींमुळे टांगती तलवार
समन्वयक शिवाजी इबितदार म्हणाले, जाचक शर्थीनमुळे पालिका हद्दीतील 70000 राहवासी नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार जैसे थे अशीच आहे, कासारवाडी, पिंपळे गुरव, थेरगाव, बिजलीनगर, चिंचवडेनगर या भागासाठी प्राधिकरण व पालिका प्रशासनाने स्वतंत्र माहिती कक्ष सुरू करणे आवश्यक आहे. या परिसरात 30000 पेक्षा जास्त अनधिकृत बाधित रहिवासी घरे आहेत. यावेळी आबा सोनवणे, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर, रजनी पाटील, सुनीता गायकवाड, माऊली जगताप, गोपाळ बिरारी, नारायण चिघळीकर, संदीप चिंचवडे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

संघर्ष 150 च्या सभेसाठी विशेष परिश्रम अमोल हेळवर, सागर बाविस्कर, माणिक सुरसे, योगेश विरोळे, नरेंद्र माने, नितीन पचपिंड, विशाल पवार, रंजित शर्मा, बाळासाहेब उबाळे, मयुर पवार, मंतोष सिंग, आबा राजपूत, भाऊसाहेब पाटील, शंकर पाटील, रवी महाजन, गौशिया शेख, बबिता ढगे,प्रदीप पवार, निलचंद्र निकम, किरण पाटील, वैशाली भांगीरे, वैशाली कदम, चंदा निवडुंगे, मोतीलाल पाटील, निकिता पाटील, कविता पाटील, गौरी सरोदे,विमल भोळे, करिष्मा इशी, पल्लवी पाटील, शुभांगी चिघळीकर, मनीषा हिवाळे, शोभा मोरे, रेखा राजपूत यांनी घेतले.