निभावणार संरक्षण कड्याची जबाबदारी
पिंपरी- यंदाही संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्र हे विशेष सेवा व संरक्षण पुरविणार आहेत. आधुनिक वॉकीटॉकी, दळणवळण साहित्यासाहित स्वयंसेवक पालखी सोहळ्याकरीता सुसज्ज राहणार आहेत. देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या लाखो वारकरी भाविकांना समितीचे स्वयंसेवक मदतनीस म्हणून सेवा पुरविणार असल्याचे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.
याबाबतची बैठक देहूरोड पोलीस ठाणे तसेच तळेगाव पोलीस ठाणे येथे नुकतीच पार पडली. या बैठकीस प्रमुख उपस्थिती देहूरोड ठाण्याचे निरीक्षक प्रकाश धस, तळेगाव-दाभाडे ठाण्याचे निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक निरीक्षक अर्जुन पवार, सहाय्यक निरीक्ष कुंदा गावडे, एल. आय. बी. पोलीस कर्मचारी अशोक नवले, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, विभागीय प्रमुख संघटक विशाल शेवाळे, तेजस सापरिया, संतोष चव्हाण, अमित डांगे, बाबासाहेब घाळी, आशिष गांधी, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.
पोलीस मित्रांची मदत मोलाची
या बैठकीस मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रकाश धस म्हणाले की, यंदा पालखी सोहळ्यास वारकरी भाविक यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याकरिता पोलीस मित्रांची मदत मोलाची ठरणार आहे. पोलीस कर्मचारी तसेच पोलीस मित्र हे संयुक्त विद्यमाने पालखीस विशेष सुरक्षा व संरक्षण देण्यास सहकार्य करतील. त्याचप्रमाणे लूटमार करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कडक नजर ठेवतील.
बंदोबस्तासाठी संयुक्तिक गट
तर पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले की, पालखी मार्गावर तसेच प्रमुख तळांवर स्वयंसेवक व पोलीस कर्मचारी यांचा संयुक्तिक गट बंदोबस्ताकरिता सक्रिय राहील. त्याचप्रमाणे गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक नियमन आराखडा तयार केला जाईल. त्याकरिता ‘विशेष पोलीस अधिकारी’ (एसपीओ) म्हणून समितीचे पदाधिकारी कार्यरत राहतील. समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की,गेल्या 15 वर्षांपासून समिती सदस्य अविरतपणे पालखी सोहळ्यास सेवा व मदत देत आहेत. यंदा समितीचे ग्रामीण भागातील स्वयंसेवक हे ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य म्हणून पालखी सोहळ्यामध्ये कार्यरत राहणार आहेत. शोधकर्ता पथक, आपत्कालीन पथक व गुप्तवार्ता भरारी पथक अश्या तीन विभागांमध्ये पोलीस मित्र स्वयंसेवक कार्यरत राहुन पोलीस व वारकरी भाविकांना मदत व सहकार्य करतील. ग्रामीण भागातील समितीच्या सदस्यांना ग्राम सुरक्षा दलाचा बॅच पोलीस निरीक्षक धस यांच्या हस्ते देण्यात आला.