पिंपरी-चिंचवड : चालू बाजारभाव आणि अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे दंडाचे शुल्क आकारुन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अर्ज असणार आहेत. शुक्रवार पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना मान्यताप्राप्त आर्किटेक्टमार्फत अर्ज करणे आवश्यक असणार असल्याची, माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी आज (गुरुवारी) पत्रकारपरिषदेत दिली. आवश्यक कादपत्रांसह कार्यालयात 15 मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आकुर्डीत स्वतंत्र कक्ष
अर्ज स्वीकारण्यासाठी आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात स्वंतत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन नागरिकांनी त्यावर घरे बांधली आहेत. त्यामुळे प्राधिकरण जमिनीचा बाजारमूल्यानुसार दर आकारणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्क असणार आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार प्राधिकरणातील भू- विभागाकडून आकारण्यात येणारे भूखंडाचे अधिमूल्य लागू असणार आहे. रहिवाससह कमर्शिअल वापरासाठी रहिवास दराच्या दीडपट दर, तर केवळ कमर्शिअलसाठी दोन पट दर लागू असणार आहेत, असे खडके यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचारी भरती
प्राधिकरणाकडे उपलब्ध कर्मचार्यांच्या सहाय्याने येथे काम पाहिले जाणार आहे. गरज भासल्यास कंत्राटी स्वरूपात कार्मचारी घेण्यात येतील. प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे उपग्रह छायाचित्र मागवले असून, संबंधित विभागाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. अर्जदाराच्या जागेची मोजणी प्राधिकरण स्वतः करणार आहे. याचबरोबर वाढीव बांधकामे केलेल्या नागरिकांना देखील अर्ज करता येणार आहेत, असेही खडके यांनी स्पष्ट केले. परंतु, सर्व नियम पडताळून वाढीव बांधकामे नियमित करण्यात येणार आहेत.
ही लागतील कागदपत्र
अर्जाच्या सोबत 31 डिसेंबर 2015 पूर्वीचा नोंदणीकृत भाडेकरार, महापालिका टॅक्स पावती, बांधकामाचे खरेदीखतबाबतच्या अभिलेखासोबतच आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, अधिवास, लाईट बिल, पाणी बिल आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्या भूखंडावरील सर्व सहधारकांना एकत्रित अर्ज करता येणार आहे, असेही खडके यांनी सांगितले.