जळगाव। भुसावळ येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 25 वर्षापासून डॉ.शुभांगी दिनेश राठी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. प्राध्यापक स्तर 4 व स्तर 5 साठी त्या 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून पात्र असतांना त्यांना अद्यापही प्राध्यापकपदी पदोन्नती देण्यात आलेली नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे मागणी केली असता संबंधित महाविद्यालयाला निवड समिती गठीत करुन पद भरण्याचे आदेश दिले. मात्र अद्यापही पदे भरण्यात आलेली नसल्याने डॉ.शुभांगी राठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यापीठाने 27 जानेवारीरोजी कोटेचा महाविद्यालय प्रशासनाला निवड समिती बोलवून रिक्त पदाची भरती करण्याचे आदेश प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांना दिले होते. याचिकाकर्त्या राठी यांनी प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी प्राचार्याकडे मौखिक व लेखी मागणी केलेली आहे. नियुक्तीचे अधिकार प्राचार्यांना असल्याने याचिकाकर्त्यांनी प्राचार्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. डॉ.शुभांगी राठी राज्यशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत.
दोन प्राध्यापिका पात्र
कोटेचा महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर सेवेत व प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या दोन प्राध्यापिका आहेत. राज्यशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.शुभांगी राठी आणि अर्थशास्त्र विभागातील डॉ.सुमित्रा पवार स्तर 4 वरुन 5 साठी पात्र आहेत. शिक्षण सचिव, संघटना, व्यवस्थापन मंडळ, स्थानिक व्यवस्थापन मंडळ यांच्याकडे दाद मागितल्यानंतरही न्याय मिळाला नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
रिक्त जागा भरल्याचे दाखविले
कोटेचा महिला महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या तीन जागा रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत प्राध्यापकांच्या गुणवत्तेनुसार भरल्या जाणार्या दोन जागा रिक्त आहेत. थेट भरती प्रक्रियेद्वारे भरले जाणारे एक पदही रिक्त आहे. नॅकसमितीला थेट भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार्या प्राध्यापकाचे पद भरण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र वास्तवात हे पद भरले गेले नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी यासंदर्भात दिली.
संबंधीत प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ठ असून न्यायालयाचे आदेश येई पर्यत काही करता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाबद्दल काही बोलणे उचीत नाही. पदभरती बाबत न्यायालयाच्या निकालानंतर पुढील कार्यवाही होईल.
डॉ.मंगला साबद्रा (प्राचार्य)
विद्यापीठाचे पत्र
डॉ.शुभांगी राठी यांनी प्राध्यापक पदावर बढती मिळण्यास त्या पात्र असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे नियुक्तीसाठी दाद मागितली. विद्यापीठाने यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला राठी यांचे सेवापुस्तिकेच्या तपासणीबाबत आदेश दिले होते. डॉ.राठी यांच्याकडे प्राध्यापक पदासाठी आवश्यक ए.पी.आय असल्याचे पत्र दिले होते. 2010-11 मध्ये राठी यांच्याकडे 113 गुण, 2011-12 मध्ये 111 गुण, 2012-13 मध्ये 115 गुण असल्याचे विद्यापीठाने पत्रान्वये महाविद्यालयाला कळविले आहे.