यवत । आमच्या सरकारने तीन वर्षात विजेची वसुली कमी केली. त्यामुळे शेतकर्यांकडे विजेचे 19 हजार कोटी रुपये थकले. वीज कंपन्यांची अवस्था बिकट झाल्याने कोळसा खरेदीसाठी अडचण झाली. त्यामध्ये आम्ही राज्यातील थकीत शेतकर्यांना 8 हजार कोटी रुपयांचे वीज बिल माफ केले. उरलेले 11 हजार कोटी रुपये 18 महिन्यात 20 टक्क्याने भरण्याची सूचना केली. परंतु शेतकर्यांनी तेही न भरल्याने चालू महिन्याचे तरी वीज बिल भरण्याची विनंती केली. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी विजेपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांच्या हस्ते रविवारी दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 37 व्या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी फडणवीस बोलत होते.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मस्त्य विकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळासाहेब भेगडे, बाबुराव पाचर्णे, माधुरी मिसाळ, बबनराव पाचपुते, रंजना कुल आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ
मोदी सरकार या वर्षी ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ केली. त्यामुळे ऊसाचा भाव व एफआरपी बाबत सरकार पुढाकार घेत आहे. त्यामुळे दर वर्षी एफआरपीसाठी होणारी आंदोलने झाली नाहीत. आम्ही कर्जमाफी केली असून जो प्रामाणिकपणे शेतकरी कर्ज भरतो त्याच्या पाठीमागे आमचे सरकार राहणार असल्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली. आम्ही बोलणारे लोक नसून वचन देणारे आहोत, असे सांगत तीन वर्षात विकास दर 12.5 झाला असून शेती क्षेत्राचा वाटा 40 हजार कोटींनी वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
2,601 रुपयांचा पहिला हफ्ता
21 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मागील सरकारच्या काळात अर्धवट राहिलेले सिंचन प्रकल्प आम्ही दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून मागील सरकार सारखा बेइमानगिरी करणार नसल्याचे फडणवीस यांनी बोलताना सांगितले. यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी आपल्या प्रास्ताविकात कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ऊसाचा पहिला हप्ता म्हणून 2,601 रुपये देणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी घोषणा केली.