‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन’ या दुर्मिळ आजारावर होणार शस्त्रक्रिया

0

25 लाखांचा खर्च गरीब कुटुबांच्या आवाक्याबाहेर

दापोडी : सामान्य मुलींप्रमाणे असणारी सायली गजभीव सहा वर्षांची असताना अचानक खेळताना दारात चक्कर येऊन पडली आणि मग चक्कर येण्याचे सत्र सुरूच झाले. डॉक्टरांना आधी फिट येत असेल असे वाटले. पण, निदानाअंती समजले की तिला ‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन’ हा दुर्मिळ आजार झाला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीचा त्रास वाढत गेला. आता तिच्यावर हृदय आणि फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी 25 लाखांपर्यंत खर्च असून, तो गजभीव कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सायलीला सर्वांच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी तिने समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले. या सायलीच्या हाकेस आमदार लक्ष्मण जगताप यांनी साद दिली.

दहाव्या वर्षापासून सुरू आहे आजाराशी सामना
सायली लाजरस गजभीव (वय 19) दापोडी येथे राहते. महागडी औषधे, वडील एकटे कमावणारे, घरी लहान भाऊ, आजी-आजोबा आहेत. दिवसेंदिवस सायलीचा त्रास वाढतच गेला. धाप लागायला सुरवात झाली. चौथीनंतर शाळेत जाणेही अवघड झाले. पण, तिने घरी राहून अभ्यास केला. परीक्षेच्या वेळी ती शाळेत जात असे. तिच्या आजाराची माहिती असल्याने शिक्षकांनीही खूप सहकार्य केले. शाळा-कॉलेजला न जाता परीक्षा देऊन सायली 12 वीपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. नंतर‘बी.कॉम.’च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. पण, त्रास खूपच वाढला. हृदयावर येणारे प्रेशर कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू झाले.

हृदय, फुफ्फुस बदलणार
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला घरीच खूप त्रास झाला. चक्कर येऊन पडली. नंतर डमिट केल्यावर तिची (2ऊ एउज) ही टेस्ट केली. पिंपळे सौदागरमधील डॉ. पाटील यांनी तिला हृदय आणि फुफ्फुस बदलावे लागेल. तरच ती जगेल, असे स्पष्ट सांगितले. नेमके काय करावे, हे तिच्या कुटुंबीयांना कळेना. सायलीचे मामा डॅनिअल केदारी आणि मामी संगीता केदारी यांनी खूप शोध घेतल्यावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाकडे झेप घेतली. आमदार जगतापांची भेट घेऊन सर्व माहिती सांगण्यात आली.

सहा लाखांची केली मदत
शस्त्रक्रियेचा व उपचाराचा खर्च गजभीव कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. आई लता गजभीव लहान-मोठे काम करतात. पण, शस्त्रक्रिया व इतर उपचार यांचा मिळून अंदाजे खर्च 30 लाखांपर्यंत जाणार आहे. अशावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या शिफारसीव्दारे मुख्यमंत्री निधीतून 3 लाख रूपये व टाटा मेमोरियल ट्र्स्ट व्दारे 6 लाख रूपेयांची मदत मिळवून दिली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी मदतनिधी मंजूर झाल्याचे पत्रक सायलीचे वडिलांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात व नगरसेवक शत्रुध्न काटे उपस्थित होते.