जळगाव। मला आता 100 वर्षे जगायचे आहे आणि देशातील 1 करोड अंध-अपंगांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांचे कल्याण करायचे आहे येत्या 2 वर्षात त्यासाठी जळगावात राष्ट्रीय स्तरावर प्रेरणा तीर्थ उभारले जाईल असा संकल्प दीपस्तंभचे संस्थापक प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांनी सोडला. रतनलाल.सी.बाफना फाउंडेशनतर्फे त्यांना आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता पुरस्काराने 5 लाख रोख, सन्मानपत्र, आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग ,प्रज्ञाचक्षू विद्यर्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या महाजन यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
प्रेरणातीर्थासाठी 2 एकर जागा
सोहळ्यात रतनलाल बाफना यांनी आपल्या प्रस्ताविकात पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद करत यजुर्वेंद्र यांच्या कार्यासाठी 1 कोटी रुपयांची देणगी दिली. तसेच राष्ट्रीय स्तरावर संस्था प्रेरणातीर्थ उभारण्यासाठी अहिंसा तीर्थजवळ 2 एकर जागा देण्याचीही घोषणा केली. कांताई सभागृहात आज झालेल्या या कार्यक्रमात मोफतराज मुणोत, नवरतनमाल कोठारी, संपतराज चौधरी, पारसमल हिरावत, राजकुमार गोलेच्छा, अशोक पटवा, सुमेरसिह बोथरा, पुरणमल अबाणी, दलीचंदजी चोरडिया, अशोक जैन, ईश्वरलाल जैन, आ. राजूमामा भोळे, मंजुळा बंब, सुशिल बाफना, सुनिल बाफना आणि प्रमुख वक्ते म्हणून इन्कम टॅक्स संयुक्त आयकर आयुक्त नागपूर शौर्य शुक्ला हे उपस्थित होते.
पुरस्कार एकट्याचा नसून सहकार्यांचाही
सत्कारानंतर बोलायला उभे राहिलेल्या यजुर्वेंद्र यांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यंत भावुक होत ते म्हणाले, देशात आज दीड कोटी अंध अपंग व्यक्ती आहेत आम्ही फक्त 200 जणांना मदत करीत आहोत, हे आमचे कार्य म्हणजे काही फार मोठे कार्य नाही. मला आजपर्यंत बरेच पुरस्कार मिळाले पंरतु घरच्या पुरस्कारने मी भारावून गेलो आहे. मी काहीच करत नाही बाफणाजींनी माझ्याकडून करवून घेतले आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणारे तसेच या सार्या मुलांचा आहे.
2 वर्षात प्रेरणातीर्थ उभारणार
येत्या 2 वर्षात प्रेरणातीर्थ उभारले जाणार असून त्यास रतनलाल बाफना यांचे नाव देण्यात येईल असे यजुर्वेंद्र महाजन यांनी सांगितले तसेच या ठिकाणी क्रॉनिक डिसेबल मुलांना शिक्षण देण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.
या मुलांना सहानुभूती नको प्रेम हवे आहे विश्वास हवा आहे. आणि पुढे जाण्याचे बळ हवे आहे. ते देण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यास आपली सर्वांची साथ आहे त्यामुळे मला हुरूप आला आहे, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक जाणीव हवी- शौर्य शुक्ला
दीपस्तंभाचे कार्य सोपे नाही त्याला अर्धे जमिनीत गाडून घ्यावे लागते ऊन , वारा पाऊस, थंडी काहीही असो मार्ग दाखविण्यासाठी उभे राहावे लागते हे कार्य यजुर्वेंद्र करीत आहेत त्यांच्या कार्याला सलाम ते या दिव्यंगांना केवळ आसराच देत नाहीत तर हाताला काम देऊन स्वतःच्या पायावर उभे करीत आहे याच्या पेक्षा मोठे कार्य ते काय असू शकते.प्रशासनाच्या आपल्या काही मर्यादा आहेत . तेथे सामाजिक जाणीव नसते ती सेवाभावी कार्यकर्त्यात असते . प्रशासनात सामाजिक जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे असे ते म्हणले. हि जी मुले आहेत त्याच्या अशक्ती, अपंगत्व नाही ते त्यान्च्याकडे पाहणारांच्या डोळ्यात , मनात आहे हि भावना दूर केली पाहिजे, असे प्रतिपादन शौर्य शुक्ला यांनी केले.