एरंडोल। तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील जि.प.ची शाळा डिजिटल करण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थी तसेच जळगाव येथील रोटरी क्लब व लायन्स क्लब यांनी आर्थिक सहकार्य करून स्तुत्य उपक्रम राबविला. ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन नंतर उच्च शिक्षण घेऊन चागल्या नोकारीवर असलेल्या तसेच व्यवसाय खासगी करणार्या विद्यार्थ्यांनी सदरचा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील आपल्या गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने या शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला.
शाळेतील अनेक समस्यांचे होणार निवारण
पिंप्री बुद्रुक हे केवळ पंधराशे लोकवस्ती असलेले गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 पासून एक किलोमीटर अंतरावर आतमध्ये आहे. येथे जिल्हापरीषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा असून गावातील विद्यार्थी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सर्व वर्गात सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. मात्र शाळेत अनेक समस्या असल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना उघड्यावरच करावे लागत होते. शाळेत शिक्षण घेतले माजी विद्यार्थी एकत्र आले व त्यांनी शाळेला डिजिटल करण्याचा संकल्प करून प्रत्यक्ष अमलात देखील आणला.
शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप सोनवणे व अविनाश सोनवणे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये किमतीचे संगणक संच दिले. तर विजय वानखेडे यांनी वडील कै.केशव वानखेडे यांच्या स्मरणार्थ सुमारे दीड लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्ष बांधून दिले. विद्यार्थ्याना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी जळगावच्या रोटरी क्लबने सुमारे 40 हजार रुपये किमतीचे फिल्टर दिले तर शाळेत प्रोजेक्टर बसविण्यासाठी जळगाव येथील लायन्स क्लबने सहकार्य केले. शाळेस जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान
माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्याना सर्व सोयी व सुविधा उपलब्ध झाल्या असून विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेत आहेत.गावातील सर्व ग्रामस्थांचे शाळा डिजिटल होण्यासाठी सहकार्य मिळाले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच माजी सरपंच तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील यांचेसह पिंप्री बुद्रुक व माळपिंप्री येथील ग्रा.पं. सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. आम्ही शिक्षण घेत असतांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा शाळेत नव्हत्या. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यामुळे नवीन पिढीला तरी उच्च दर्जाचे व डिजिटल शिक्षण मिळावे या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी हा समाजहिताचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.