प्रियंकाचा करिष्मा

0

दिड महिन्यापुर्वी पाच राज्याच्या विधानसभांची रणधुमाळी सुरू झालेली होती. त्यात सर्वात आधी पंजाब व गोव्याचे मतदान झाले आणि नंतर सर्वात मोठ्या मानल्या जाणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभेचे मतदान सुरू झाले होते. तेव्हा सोनिया गांधींची कन्या व राहुलची भगिनी प्रियंकाचा खुप बोलबाला झालेला होता. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे कॉग्रेसचे प्रभावी नेते होते आणि त्यांच्यामुळेच तिथे कॉग्रेस सत्तेत येणार असल्याचे बोलले जात होते. तर त्यात आधी राहुलनी घोळ घातला आणि अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यास नकार दिला होता. पण अखेरीस तेच करावे लागले. अर्थात राहुल कॉग्रेस बुडवित असल्याविषयी कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही. त्यांनी पक्षाला पुरते बुडवले, मग त्यातून त्यांचीच भगिनी प्रियंका कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करणार, याहीबद्दल बहुतांश कॉग्रेसनेते निश्चींत आहेत. म्हणून तर अधुनमधून प्रियंकाच्या करिष्म्याच्या गोष्टी चघळल्या जात असतात. प्रियंका आली वा तिचा कुठे स्पर्श झाला, त्यामुळे कोणते चमत्कार घडले, त्याच्या मनोरंजक गोष्टी माध्यमे अगत्याने प्रसिद्ध करीत असतात. अशीच एक गोष्ट पंजाबच्या बाबतीत घडली होती. पंजाबमध्ये कॉग्रेसचे बळ वाढवण्यासाठी गांधी कुटुंबाच्या वारसांनी काहीही करण्याची गरज नव्हती. तरीही ही बाळे तिथे लुडबुडत होती. त्यातला प्रियंकाचा भाग फ़ारसा चर्चिला गेला नव्हता. आज त्याचीच फ़ळे अमरिंदर सिंगांना भोगावी लागत आहेत. कारण त्यांनी मोठे बहूमत मिळवले आणि सरकारही स्थापन केलेले आहे. पण दरम्यान प्रियंकामुळे या मुख्यमंत्र्याच्या पायात लोढणे अडकवले गेले आहे. त्याचे नाव आहे नवज्योतसिंग सिद्धू! आता पंजाबच्या नव्या कॉग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री विरुद्ध सिद्धू असा नवा संघर्ष पेटलेला आहे. त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? त्याची मुळात गरज होती काय?

नवज्योत सिद्धू हा स्वयंभू माणूस आहे. उमेदीच्या कालखंडात क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आपेल्या सिद्धूने, पुढल्या काळात क्रिकेट समालोचनात भाग घ्यायला आरंभ केला. तेव्हा आपल्या भाषाशैली व नेमक्या मजेशीर किस्से सांगण्याने सिद्धू प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला. प्रामुख्याने कुठले तरी शेरशायरी वा संदर्भ सुभाषिते सांगून गप्पा रंगवणार्‍या सिद्धूला एका वेगळ्या कार्यक्रमाने अधिक लोकप्रियता मिळाली. शेखर सुमन या कलाकाराने नकलाकारांचा एक स्पर्धात्मक कार्यक्रम सुरू केला. त्यात जोडीला हजरजबाबी सिद्धूलाही सहभागी करून घेतले. त्यातून वाहिन्यांवर नकलाकार व विनोदी कार्यक्रमांचे पेव फ़ुटले. त्याचाच एक धुमारा म्हणून कपिल शर्मा शो नावारूपाला आला. सुमनच्या स्पर्धात्मक मालिकेत अजिंक्य ठरलेल्या कपील शर्माला हाताशी धरून वेगळ्या धर्तीचा कार्यक्रम सुरू झाला, यात खिदळण्याच्या ख्यातीमुळे सिद्धूचा समावेश झाला. आता तोच कार्यक्रम सिद्धूसाठी व्यवसाय झालेला आहे. दरम्यान सिदधू राजकारणात शिरला होता आणि भाजपातर्फ़े त्याने अमृतसरची जागा अनेकदा जिंकलेली होती. मात्र पंजाबात अकालींशी असलेली भाजपाची मैत्री सिद्धूला कधी रुचली नाही. परिणामी गेल्या लोकसभा मतदानात त्याला ती जागा सोडावी लागली होती. तरीही तो भाजपात होता आणि म्हणूनच त्याची गतवर्षी राज्यसभेत नेमणूकही झाली होती. मग गेल्या जुलै महिन्यात त्याने राज्यसभा सदस्यत्वाचा व भाजपाचा राजिनामा दिला. तेव्हा सिद्धू कुठल्या पक्षात जाणार, याची चर्चा रंगलेली होती. आधी त्याला आम आदमी पक्षाने आमंत्रण दिले. पण मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य नसल्याने सिद्धूने तिकडे पाठ फ़िरवली. मग कॉग्रेसनेही त्याला आमंत्रण दिले. पण अमरिंदर सिंग यांनाही सिद्धू नको होता. प्रियंकाच्या आग्रहाखातर तिथे अमरिंदर सिंग यांना हे लोढणे गळ्यात बांधून घ्यावे लागले.

ऐन निवडणूकीत पक्षात बेबनाव नको म्ह्णून अमरिंदर गप्प बसले आणि दिल्लीत परस्पर सिद्धूला पक्षात प्रवेश मिळाला. तेव्हा किमान उपमुख्यमंत्री करणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. मात्र निवडणूका संपल्या व सत्ता आल्यावर अमरिंदर सिंग यांनी त्याला नकार दिला. तिथूनच सिद्धीची नाराजी सुरू झाली असल्यास नवल नाही. पण निदान आपल्याला महत्वाचे मंत्रीपद मिळावे, अशी त्याची अपेक्षा आहे. तिथेही अमरिंदर यांनी टांग मारलेली आहे. त्याबद्दल सिद्धू नाराज असल्याच्या बातम्या आल्या. तेव्हा अमरिंदर यांनी आपल्या अनुभवाचा आधार घेऊन या क्रिकेटपटूला नेमका शह दिलेला आहे. सिद्धू आता एका राज्याचा मंत्री आहे आणि मंत्री हे पुर्ण वेळ काम असल्यानेच त्याला अन्य कुठल्या मार्गाने उत्पन्न मिळवण्याचा अधिकार उरत नाही. असे असताना कपील शर्मा शोमध्ये सिद्धूने काम करण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. नुसती चर्चा नाही, तर त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी कायदेतज्ञांचा सल्ला मागितला आहे. म्हणजेच त्यांनी अतिशय काळजीपुर्वक सिद्धूचे पंख छाटण्याची खेळी केली आहे. सिद्धूने मंत्रीपद टिकवण्यासाठी टिव्हीचा कार्यक्रम सोडावा, किंवा मंत्रीपद सोडावे असा तिढा आता निर्माण झाला आहे. खरे तर असे काही व्हायची गरज नव्हती. सिद्धूला पक्षात घेतलाच नसता, तर ही डोकेदुखी झाली नसती. पण प्रियंकाचा करिष्मा दाखवण्यासाठी सिद्धूला कॉग्रेसमध्ये घेतले गेले आणि आता ती नव्या मुख्यमंत्र्याला डोकेदुखी झालेली आहे. पंजाब असो वा उत्तरप्रदेश असो, तिथे निवडणुका जिंकण्यात राहुल वा प्रियंकाचा कुठलाही लाभ पक्षाला मिळालेला नाही. पण जे कोणी मेहनत करतात, त्यांना डोकेदुखी निर्माण करण्यास मात्र त्यांचा हातभार मोठा लागत असतो. जे पंजाबमध्ये प्रियंकाने केले, तेच उत्तरप्रदेशातही झाले आहे. तिच्यामुळे रायबरेली वा अमेठीतल्याही सर्व जागा कॉग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत. याला करिष्मा म्हणतात.

उत्तरप्रदेशात कॉग्रेसने राहुलच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम प्रचाराची मोहिम आरंभली. किसान यात्रा काढून खाटचर्चा योजल्या. राहुलनी त्याचा पुरता बोजवारा उडवून दिला. मग राहुल वा कॉग्रेसच्या हातून होणे हे कार्य शक्य नसल्याने रणनितीकार प्रशांत किशोरने समाजवादी पक्षाशी आघाडीची बोलणी केली होती. पण तसा अधिकार त्याला कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करून आघाडीची कल्पनाच निकालात काढली गेली होती. मात्र लौकरच कॉग्रेसश्रेष्ठींना आपण निकामी असल्याचा साक्षात्कार झाला व अखिलेश यादवशी बोलणी झाली. पण राहुलच्या आडमुठेपणाने त्याचाही विचका झाला. अर्ज भरण्याचे दिवस सुरू झाले, तेव्हा धावपळ करून चारशेपैकी शंभरावर जागा पदरात पाडून घेण्यात आल्या आणि त्या महान आघाडीचे श्रेय प्रियंकाला देण्यात आले. त्यानंतर अखिलेशची पत्नी डिंपल व प्रियंका एकत्रित राज्यभर प्रचार करणार व त्यांच्या करिष्म्याने मोदींचा प्रभाव धुतला जाणार, असा खुप बोलबाला झाला होता. प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा राहुलसह प्रियंकाच्या करिष्म्याशी संगतसोबत केलेल्या समाजवादी पक्षाचीच प्रतिष्ठा धुळीस मिळाली. बाकीच्या उत्तरप्रदेशात प्रियंकाचा करिष्मा किती चालला, ते बाजूला ठेवा. अमेठी व रायबरेली या पारंपारिक भागातही प्रियंका दहातल्या दोनपेक्षा अधिक जागा कॉग्रेसला मिळवून देऊ शकली नाही. प्रियंकाने नुसते फ़िरावे आणि जादूची कांडी फ़िरल्यासारखा उत्तरप्रदेश कॉग्रेसच्या गोटात दाखल होणार, अशा माध्यमातून रंगवल्या जाणार्‍या गप्पांचे पितळ निकालांनी उघडे पाडले. मागल्या महिन्यात प्रियंकाची भजने-प्रवचने गाणार्‍या पत्रकार माध्यमांना निकालानंतर प्रियंका आठवलेली सुद्धा नाही. ह्या करिष्म्याने कॉग्रेसला २८ जागांवरून ७ जागांवर आणून ठेवले आहे. पलिकडे पंजाब राज्यात आपल्याच मेहनतीने मिळवलेल्या सत्तेत प्रियंकामुळे मुख्यमंत्र्याच्या गळ्यात सिद्धू नावाचे लोढणे अडकवले गेले आहे.