प्रियकरासाठी तिने केली स्वतःच्याच घरी चोरी, प्रियकर दागिन्यांसहीत पसार

0

पुणे । प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पुण्यातील एका महिलेने आपल्या पतीच्या घरी चोरी केल्याची माहिती समोर येते आहे. रूपाली जनार्दन निंबाळकर असं या महिलेचे नाव आहे. घरातील दागिने चोरी करून प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय रूपालीने घेतला होता. त्यासाठी घरातील दागिने चोरी करून तिने ते दागिने प्रियकराला दिले. पण दागिने घेऊन रूपालीचा प्रियकर फरार झाला आहे. याप्रकरणी विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
24 मे रोजी ही घटना घडली होती. रूपाली निंबाळकर 24 तारखेच्या रात्री बॅगेतून काहीतरी घेऊन जात असल्याचे त्यांच्या पतीने पाहिले होतं. त्यावेळी जनार्दन यांनी रूपालीचा पाठलाग केला पण अंधार असल्यामुळे रूपाली कोणाला भेटते आहे ते समजले नव्हते. रूपाली घरी आल्यानंतर ती कोणाला भेटली होती हे जाणून घेण्याचा जनार्दन निंबाळकर यांनी प्रयत्न केला.

सुरूवातीला बिचकलेल्या रूपालीने पतीच्या चौकशीनंतर तीच्या प्रेमप्रकरणाची कबूली दिली असल्याची माहिती मिळते आहे. भारत सरगम नावाच्या एका व्यक्तीबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचे रूपालीने तीच्या पतीला सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तीने पतीसमोर कबूल केले आहे. आम्ही दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये आम्ही दोघं जाणार होतो, असेही रूपाली म्हणाली. 24 मे रोजी मी भारतला भेटली होती आणि घरातील 30 तोळे सोन्याचे दागिने भारतला दिल्याचे रूपालीने तीच्या पतीला सांगितले. दोघांना नवी नोकरी मिळे पर्यंत दागिने विकून मिळणार्‍या पैशांवर उदरनिर्वाह करणार असल्याची कबूली रूपालीने दिली आहे. पण दागिने मिळाल्यानंतर रूपालीच्या प्रियकराने तीच्याशी बोलणे बंद केल्याचे आणि भारत दागिने घेऊन पळून गेल्याचे रूपालीच्या लक्षात आले. याप्रकरणी जनार्दनने रूपाली आणि सरगमच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विमान नगर पोलिस दागिने घेऊन फरारा असलेल्या भारत सरगमचा शोध घेत आहेत.