शिरपूर । शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणीत 2 हजार 257 सभासद व अन्य सहकारी संस्था मिळून 107 कोटी रूपयांच्या ठेवी अडकल्या असून सदर ठेवी 2010 पासून देणे बंद केले आहे. या ठेवी सभासदांना मिळवून देण्यासाठी सर्वप्रकारची कायदेशीर प्रशासकीय तसेच विविध माध्यमातून आंदोलन करून प्रयत्न केले जातील असे आश्वासन काल दि.7 रोजी शिरपूर शहरातील विजयस्तंभ चौकात प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणीच्या ठेवीदार संघर्ष समितीच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात भाजपाचे डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी ठेवीदारांना आश्वासन दिले. सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेले हे लाक्षणिक उपोषण सायंकाळी 4 वाजता संपले. यावेळी 205 ठेवीदारांनी रजिस्टरमध्ये आपल्या नावांसह नोंद केली. त्यानंतर येथील उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे निवेदन देवून वाडी येथील एका ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेलेले पदाधिकारी,ठेवीदार व पो.नि.सानप यांच्यात बराचकाळ तु-तु, मै-मै झाले. शेवटी पोलिस प्रशासनाने तक्रारीची प्रत घेवून सहकार विभाग व कायदेशीर सल्ला घेवून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीसह अमरिशभाई पटेल यांच्या इतर सहकारी संस्थांमध्ये भागधारक असलेल्या विविध पंचक्रोशीतील गावांमधून आलेल्या ठेवीदार महिला-पुरूषांची लक्षणीय उपस्थिती होती. जमलेल्या ठेवीदार समुहामध्ये आक्रोशासह अडकलेल्या पैशांबद्दल चिंता आणि संबंधितांविरूद्ध संतप्तता होती.
पोलिस ठाण्यात समिती व प्रशासनाची तु-तु मै-मै…
वाडी येथील ठेवीदार गुरूदास चिंधू पाटील (गुजर) यांनी 4 लाख 76 हजार 859 रूपये प्रियदर्शिनी सुतगिरणीत अडकले असून ते मिळाले नाहीत या संदर्भात तब्बल सात पानांची तक्रार पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे दिली. या तक्रारीत आ.अमरीशभाई पटेल, चेअरमन भुपेशभाई पटेल यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी अशा 35 जणांविरोधात तक्रार दिली. मात्र समितीचे सर्व सदस्य तक्रार देण्यासाठी गेले असता समितीचे सदस्य व पो.नि.संजय सानप यांच्यात बराचवेळ तु-तु मै-मै झाली. सानप हे आपण दिलेल्या तक्रारीची प्रत स्विकारत असून यावर योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करेल असे सांगितल्यानंतर समितीच्या अनेक सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. आपण कोणाच्याही तरी दबावाखाली तक्रार घेत नाहीत असा आरोप देखील करण्यात आला. मात्र याला कमीत कमी एक महिना कालावधी लागू शकतो असे सांगितल्यानंतर बराच काळ गोंधळ सुरू होता.
कायदेशीर सल्ला घेणार…
यावेळी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप पोलिस प्रशासनावर करीत होते. अॅड. अमित जैन, अॅड. गोपाल राजपूत हे कायदेशीर बाजू मांडत होते तर बबन चौधरी, डॉ. जितेंद्र ठाकूर, तुषार रंधे, राहुल रंधे यांच्यासह अनेकजण गुन्हा दाखल करण्याबाबत ठाम होते. शेवटी सानप यांनी तक्रारीची प्रत त्यांच्याकडून घेतली. यावर सहकार विभागाशी विचार विमर्श केला जाईल व कायदेशीर सल्ला देखील घेण्यात येईल असे पो.नि.सानप यांनी सांगितले. मात्र पो.नि.सानप यांनी यासंदर्भात लेखी द्यावे अशी भूमिका अनेकांनी मांडली परंतु पो.नि.सानप यांनी फेतक्रारीची प्रत घेतली. मात्र कोणत्याही प्रकारचे लेखी समितीला दिले नाही.सुतगिरणीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याने येणार्या काळात ठेवीदारांचा पैसा मिळतो किंवा नाही याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
तहसिलदारांना दिले निवेदन
उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी ठेवीदारांना त्वरीत न्याय मिळवून देऊन कष्टाचा पैसा परत मिळावा अन्यथा ठेवीदारांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मिलिंद पाटील, जे.के., हेमराज राजपूत, प्रकाश महाजन, सुभाष चौधरी, मोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण सुरूच होते.
प्रियदर्शिनीने केला विश्वासघात..
प्रियदर्शिनी सुतगिरणीने ठेवीदारांचा पुर्णपणे विश्वासघात केला असून तब्बल 107 कोटी रूपयांच्या ठेवी अडकल्या आहेत यापूर्वी विविध सबबी व कारणे दाखवून पावत्यांची र क्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. आता तर ठेवीचे पैसे मिळणेदेखील बंद झाले आहे. येणार्या काळात हे आंदोलन तीव्र स्वरूप घेईल, डॉ.जितेंद्र ठाकुर म्हणाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी देखील ठेवीदारांनी मोठ्या कष्टाने कमवलेला पैसा हा सुतगिरणीने परत करावा. आंदोलनाच्या पाठिशी भाजपा उभा राहिले, असे आश्वासन दिले. वाडी येथील ठेवीदार आशाबाई चौधरी यांनी आपल्या बोलीभाषेत अत्यंत संतप्त अशा शब्दात बोलतांना माझे सूतगिरणीत 10 लाख रूपये अडकले असून मणक्याच्या ऑपरेशनसाठी 6 लाख रूपये लागणार असल्याने अनेकदा आ.अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, प्रसन्न जैन यांचे उंबरठे झिजविले मात्र आजपयरत माझ्या घामाचा पैसा ऑपरेशनसाठी मला मिळू शकला नाही. सुनिता पाटील वाडी यांनी देखील अडकलेल्या ठेवींसंदर्भात अत्यंत संतप्तपणे बोलतांना त्यांच्याकडे जावून आपण थकलो असून आता तर ते फोन देखील उचलत नाहीत. व एकमेकांची नावे सांगून टोलवा टोलवी केल्याचा प्रकार त्यांनी सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी लोकशाहीमध्ये दादागिरी चालू शकत नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या व्यासपीठाचा वापर करावा. संघटीत झाल्याशिवाय ठेवीचे पैसे परत मिळणार नाहीत आ.अमरीशभाई पटेल व त्यांच्या टीमचे स्वत:चे व्यवसाय सुरळीत चालविले असून सहकारी संस्था मात्र डबघाईस आणल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा आशय…
प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणीत 2 हजार 257 सभासद व अन्यकाही सहकारी संस्था मिळून 107 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. असा अहवाल शासकीय अधिकार्यांनी पडताळणी करून दिला आहे. मात्र सन 2010 पासून सुतगिरणी व्यवस्थापनाने ठेवींची रक्कम परत करणे बंद केले आहे. यापूर्वी ठेवीदारांना विविध सबबी कारणे दाखवून ठेव पावत्यांची र क्कम परत देण्यास टाळाटाळ केली. आतातर संचालकांनी पैसा परत देण्यास हात वर केले आहेत. सुतगिरणी ही आ.अमरीशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांच्या ताब्यात आहे. ठेवी कधी व कश्या परत देतील या संदर्भात कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले दिसत नाही. त्या दिशेने हालचाल देखील होत नाही. याचा अर्थ ठेवी धो3यात आल्या आहेत. सुतगिरणीच्या मालकीची जमिन स्वत:च्या कंपनीसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर घेतली व ती पोटभाडेकरू म्हणून टे3सटाईल उद्योगांना दिली या पोटभाडेकरू कंपन्यांनी ही जमिन तारण ठेवून भरमसाठ कर्जे उचललीत त्यांनी कर्जफेड न केल्यास सुतगिरणीच्या मालकीची जमिन बँका जप्त करतील हे उघड आहे. म्हणजेच सुतगिरणीच्या मालकीच्या जमिनीचे लाभार्थी हे तथाकथित उद्योगपती झालेत. आणि मूळमालक सभासद आणि ठेवीदार भिकेला लागले आहेत. याबाबत ठेव पावत्यांची र क्कम मिळणेबाबत यो1/2य ते आदेश शासन स्तरावर करण्यात यावे तसेच सूतगिरणीच्या संचालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
या मान्यवरांसह ठेविदारांची उपस्थिती
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, डॉ.जितेंद्र ठाकूर, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, तालुकाध्यक्ष राहुल रंधे,जि.प.सदस्य संजय पाटील, नगरसेवक चंदनसिंग राजपूत,राजूअण्णा गिरासे,मोहन साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष साहेबराव मंडाले, अॅड.अमित जैन, अॅड.गोपाल राजपूत, अॅड.शाम पाटील, डॉ. सरोज पाटील, डॉ.मनोज महाजन, रामकृष्ण पाटील, कोमलसिंग राजपूत, मनोज पाटील, प्रकाश महाजन, नानाभाऊ पाटील, मिलिंद पाटील, चंद्रकांत पाटील, भरतसिंग राजपूत, मयुर राजपूत, राज राजपूत, महेंद्र पाटील, देवेंद्र राजपूत, गुरूदास गुजर, निलेश महाजन, विलास पाटील, प्रताप सरदार, शेखर माळी, सलीम शेख, सुभाष चौधरी, आशाबाई चौधरी, स्मिता पाटील, जागृती शहा, जिविशा शहा, श्रीमती जसवंती कोठारी, हिरालाल परदेशी यांच्यासह शेकडो ठेवीदारांची उपस्थिती होती.