मुंबई । यंंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ गाजवणारी मल्ल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियारचा व्हायरल व्हिडिओ मागील दोन दिवसांत न पाहिलेली व्यक्ती अपवादानेच सापडेल. नुसत्या नजरेने ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचवणार्या प्रियाने स्वत:च चित्रपटातील त्या दृश्यामागचा गमतीदार किस्सा एका मुलाखतीत शेअर करून त्यामागील गुपित उघड केले आहे. ती म्हणाली, ‘शाळेच्या अल्लड वयातील निरागस प्रेम मी अभिनयातून साकारावे, अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. भुवया उडवण्याचा आमचा सीन आधीच ठरला होता. पण भुवया उंचावताना डोळा मारायचा, हे मात्र ठरले नव्हते.
नवे करण्याच्या प्रयत्नातून झाली कृती
आपण असे काहीतरी हटके करू शकतो, अशी कल्पना डोक्यात आल्यावर ती ट्राय करायची असे ठरले. एकाच टेकमध्ये सगळे फायनल झाले. दोन-तीन रिटेक झाले असते तर त्यातला फ्रेशनेस, सहजता निघून गेली असती, असे ती म्हणाली. मीसुद्धा नवे काहीतरी करून पाहावे म्हणून प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे हे सगळ्यांनाच आवडले’, असे तिने सांगितले. प्रियाने नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्षे ती मोहिनीअट्टम शिकत आहे. तिच्या नृत्यकलेचा फायदा तिला त्या दृश्यात नेमके हावभाव आणण्यासाठी झाला, असे ती म्हणाली. ‘ओरू अदार लव्ह’ या चित्रपटातून प्रिया ही मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून पदार्पण करणार आहे.