प्रेमचंद मानवतेला समर्पित साहित्याचे सर्जक!

0

जळगाव । मुन्शी प्रेमचंद केवळ एका भाषेचे साहित्यकार नव्हते तर अखिल मानवतेचे सर्जक होते. त्यांच्या साहित्यातून मानवतेची आराधना करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळातील उपदेश, मनोरंजन आणि चमत्कारी वातावरणातून साहित्याला बाहेर काढून त्यांनी साहित्याला मानव जीवनाच्या वास्तव व सत्याशी जोडले. शोषितांच्या, वंचितांच्या जीवनाला कथा-कादंबरी मध्ये स्थान दिले. गोदान, निर्मला, सेवासदन, गबन, कफन, पूस की रात, ठाकूर का कुआं, ईदगाह यासारख्या रचना त्यांना विश्व साहित्यकारांच्या पंक्तीत बसविणार्‍या आहेत. त्यांना वाचणे माणुसकीला हृदयात साठविण्यासारखे आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेश तायडे यांनी केले.

महान साहित्यकारास अभिवादन
मूळजी जेठा महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आज महाविद्यालयात हिंदी साहित्याचे महान साहित्यकार मुन्शी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रामात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपस्थित डॉ.चंद्रमणी लभाणे यांनी या महान साहित्यकाराला अभिवादन करतांना आपले मत व्यक्त केले. प्रेमचंद यांचे संपूर्ण साहित्य मानसशास्त्र दृष्टीकोनातून प्रगल्भ आहेत. त्यात मानवी मनाचे विविध पैलू उघड होतात. माणसाशी निगडीत भाव-भावना, मनोविकार आणि सामाजिक ताण-तणावाचे चित्रण उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

कथांचे वैशिष्ट केले विशद
कला शाखेच्या समन्वयिका डॉ.प्रज्ञा जंगले यांनी देखील साहित्यिक प्रेमचंद यांच्या लिखाणातील सशक्त बाजू मांडतांना, शेवटच्या माणूस केंद्रबिंदू ठेवून लिहिलेल्या साहित्यातील समाज, भूगोल, राजकारण आणि मानवता याविषयी आपले मनोगत प्रकट केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या व्यतिरिक्त हिंदी विभागातील विद्यार्थिनी सपना चौधरी, चेतना अहिरराव आणि वैशाली सोळंके यांनी प्रेमचंदांच्या कफन, इदगाह कथांचे वैशिष्ट्य विषद केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हिंदी विभागातील प्रा.विजय लोहार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.