प्रेमप्रकरणातून आल्हाटवाडतील तरुणीची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : प्रियकराने विवाहास नकार दिल्याच्या नैराश्येतून आल्हाटवाडी, मोशी येथील एका तरुणीने आत्महत्या केली. पूजा सुनील आल्हाट (वय 22) असे तिचे नाव आहे. मंगळवारी सकाळी 7:30 च्या सुमारास आत्महत्त्येची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर पंकज उर्फ अर्जुन कैलास सस्ते (वय 28, रा.मोशी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वर्षापासून प्रेमसंबध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि पंकज यांच्यात एक वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. तिने लग्नाचा विषय काढल्यानंतर काही दिवसांपासून दोघांत दुरावा निर्माण झाला होता. तो तिच्याशी बोलणे देखील टाळत होता. सोमवारी सकाळी 11 वाजता पूजा घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नसल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरु केली. सकाळी शेतातील विहिरीजवळ तिचा मोबाईल आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला. याप्रकरणी तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनीमृतदेह बाहेर काढला.

व्हॉटस् अ‍ॅपवरील संभाषण तसेच
पंकज आणि पूजा यांच्यात व्हॉटसअ‍ॅपवरील संभाषण मोबाईलमध्ये तसेच होते. यात पूजाने तू मला का फसवलेस असा संदेश पंकजला पाठवल्याचे समोर आले आहे. पूजा ही सुशिक्षित होती. तसेच पंकजचे कपड्यांचे दुकान आहे. एकाच गावात असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण जुळले होते. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.