प्रेमप्रकरणातून दहावीच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून

0

निगडीतील पूर्णानगर येथील थरारक घटना

पिंपरी-चिंचवड : पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून तसेच त्याच्या मान व डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. निगडी येथील पूर्णानगरमध्ये हा थरारक प्रकार घडला. प्रेमप्रकरणातून खून झाला असून, याप्रकरणी अकरावीच्या विद्यार्थ्यास अटक करण्यात आली आहे. वेदांत जयवंत भोसले (वय 15, रा. पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहित प्रदीप मागीकर (वय 18, रा. पूर्णानगर, निगडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत हा चौकात एकटा असल्याचे पाहून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला गाठले, व त्याच्यावर हल्ला चढविला. गळा चिरून मान व डोक्यावर सपासप वार करण्यात आले होते. काही प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी धावल्यानंतर मारेकरी पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्राणज्योत मालविली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वेदांत ज्या मुलीसोबत अभ्यास करायचा त्या मुलीवर संशयित आरोपी रोहन हा प्रेम करायचा. वेदांत अभ्यासाच्या माध्यमातून त्या मुलीच्या जवळ येत असल्याचा समज रोहनचा झाला होता. याच कारणावरून वेदांत याचा खून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे.

वेदांत हा माता अमृता शाळेतील विद्यार्थी
निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पूर्णानगर येथील जुन्या आरटीओच्या मागच्या बाजूला एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. रस्त्यावर मयत वेदांत गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वेदांत हा निगडी येथील त्रिवेणीनगरमधील माता अमृता शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो आपल्या मैत्रिणीसोबत अभ्यास करीत होता. अभ्यासाला उशीर झाल्याने तो मैत्रिणीला तिच्या घरी सोडविण्यासाठी गेला. परत येत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्याची दहावीची परीक्षा सुरु होती. याप्रकरणी निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पालकवर्ग धास्तावला, गुन्हेगारी बोकाळली
पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्णानगर चौकातून येत असलेल्या वेदांतला एकटाच असल्याचे पाहून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. हे मारेकरी त्याच्या पाळतीवर असल्याचा संशय आहे. या टोळक्याने त्याचा गळा चिरला व नंतर त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. त्यामुळे वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. काही प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहून तातडीने चौकात धाव घेतली. नागरिक येत असल्याचे पाहून मारेकरी टोळके पसार झाले. या घटनेची माहिती तातडीने निगडी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने वेदांतला खासगी वाहनाद्वारे रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या चोवीस तासांत खुनाची ही दुसरी घटना घडली आहे. केवळ प्रेमप्रकरणाच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा अशाप्रकारे निर्घृण खून झाल्याने पालकवर्ग प्रचंड धास्तावला असून, पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी कोणत्या टोकाला गेली आहे, याचा प्रत्यय आला आहे.