पिंपरी-चिंचवड : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत आदित्य सुनील जैद (वय 18, रा. निगडी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निगडी ठाण्यातील हवालदार सुनीता जैद यांचा आदित्य मुलगा आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडविण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त असून, पोलिस पुढील तपास करत होते.
प्रेमप्रकरणातून प्रकार?
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आदित्य शिकत होता. सोमवारी त्याच महाविद्यालयातील मोहननगरातील काही विद्यार्थ्यांनी फिरायला जावूया म्हणून त्याला मोटारीत बसवत मोशी परिसरात नेले. पूर्वीच्या किरकोळ कारणाचा मनात राग धरून त्यांनी मोशीजवळ त्याला लाथा, बुक्यांनी मारहाण केली. या बेदम मारहाणीत आदित्य गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला भोसरी एमआयडीसीतील खासगी रूग्णालयात दाखल करून सर्वजण पसार झाले. मात्र उपचारापूर्वीच आदित्यचा मृत्यू झाला होता. या बाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रूग्णालयात पाठविण्यात आला. पिंपरी पोलिसांकडे चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.