प्रेमविवाहाच्या रागातून मुलीचे अपहरण

0

पुणे । मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने तिला माहेरी बोलावून अपहरण केले आणि तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्याचा कट रचून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच प्रकरणात यापूर्वी पत्नीस मारण्याचा प्रयत्न केल्यावरून जावयाने सासूला पेटवून दिल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी सबंधित विवाहितेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आई, भाऊ आणि मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

युवतीने आईचा विरोध पत्करून सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ती गरोदर राहिली. तिच्या आईला ही माहिती समजल्यानंतर तिने गोड बोलून मुलीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर 30 जुलैला मुलीस के.के. मार्केट येथे खरेदी करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. तेथे जबरदस्तीने कारमध्ये बसवून नांदगाव येथे नेले. तेथे एका खोलीत कोंडून ठेवून नंतर तिला स्वारगेट येथील रुग्णालयात नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्याचा कट रचला. त्यासाठी तिला लॉजमध्ये कोंडून ठेवले होते. दि. 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे मुलीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याच प्रकरणात पत्नीस मारण्याचा प्रयत्न केल्यावरून मंगळवारी दुपारी जावयाने सासूला मारहाण करीत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती. यात युवतीच्या पतीविरोधात तिच्या आईने बिबवेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. युवतीनेही तिची आई आणि भावाविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. बी. बर्गे करीत आहेत.