प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

0

चिंचवड : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकाने त्याच्या मित्रांच्या मदतीने तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी दुपारी चारला बिजलीनगर परिसरात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला करणार्‍या तिघांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्‍वर दशरथ शिंदे (वय 18, रा. बिजलीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, किट्या उर्फ कृष्णा घंटेश्‍वर (वय 24), पाप्या (पूर्ण नाव माहिती नाही, वय 23) व शंकर्‍या गायकवाड (वय 23) सर्व रा. नागसेननगर, बिजलीनगर झोपडपट्टी, चिंचवड, अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

मित्रांच्या मदतीने केले कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या बहिणीसोबत ज्ञान्या ऊर्फ ज्ञानेश्वर शिंदे याचे प्रेमसंबंध आहेत, असा समज झाल्याने संशयित आरोपी किट्या उर्फ कृष्णा घंटेश्‍वर याच्या मनात ज्ञानेश्‍वर याच्याविरुद्ध राग होता. याच रागातून त्याने त्याचे मित्र पाप्या व शंकर्‍या यांच्या मदतीने ज्ञानेश्‍वर याच्यावर रविवारी दुपारी चारला कोयत्याने वार केले. या घटनेत ज्ञानेश्‍वर याच्या डोक्यावर तसेच दोन्ही पायांवर गंभीर इजा झाली आहे. या घटनेनंतर ज्ञानेश्‍वर याचे वडील दशरथ शिंदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित किट्या, पाप्या व शंकर्‍या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.