प्रेमसंबंधात तगादा लावणार्या प्रेयसीचा खून : आरोपीला अटक
शिंदखेडा तालुक्यातील गुन्ह्याची धुळे गुन्हे शाखेने केली उकल : मयत व आरोपी सुरतचे रहिवासी
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शिंदखेडा तालुक्यात झालेल्या खुनाची उकल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीच्या गिधाडे येथील पुलावर मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळला होता. धुळे गुन्हे शाखेने या तरुणीची ओळख पटवत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. मनोज उर्फ मनोहर युवराज पाटील (सुरत) असे अटकेतील आरोपीचे तर रुपाली उर्फ माया संदीप पाटील (31, दिंडोली, सुरत) असे मयत तरुणीचे नाव आहे.
प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने केला खून
मयत रुपाली उर्फ माया पाटील यांच्या पतीचे एक वर्षांपूर्वीच निधन झाल्याने त्या सुरत येथे वास्तव्यास होत्या. संशयीत आरोपी मनोज पाटील व त्यांच्यात ओळख निर्माण झाल्यानंतर आरोपीने रुपाली यांना प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने चारचाकीने नंदुरबार येथे आणले व तेथून शिंदखेडा जवळील गिधाडे पुलावर क्लोरोफार्म सुंगवून तरुणीचा गळा आवळून खून केला व पळ काढला. सुरुवातीला तरुणीची ओळख न पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा बारकाईने तपास केल्यानंतर सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी तरुणीसोबत एक पुरूष गुजरात पासींग वाहनाबाहेर उभे राहून गप्पा मारीत होता, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर मयत गुजरातमधील असावी, अशी शक्यता गृहीत धरून पथकाने सुरतमधील विविध भागात जावून तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मयत डिंडोली, उधना, सुरत भागातील रहिवासी असल्याची ओळख पटली व गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली.
तगादा लावल्याने केला खून
स्थानिक गुन्हे शाखेने मनोज उर्फ मनोहर युवराज पाटील (सुरत) यास अटक केल्यानंतर त्याची विचारपूस केल्याने आरोपीने खुनाची कबुली दिली शिवाय तरुणी आपल्यामागे तगादा लावत असल्याने तिचा खून केल्याची त्याने कबुली दिली आहे. आरोपीविरोधात शिंदखेडा पोलिसात मयत तरुणीचा भाऊ गौरव अनिल पाटील (रा.दिंडोली, सुरत) याने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अधिक तपासासाठी शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
हा गुन्हा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार रफिक पठाण, संजय पाटील, राहुल सानप, गौतम सपकाळे, संदीप सरग, महेंद्र सपकाळ, सुनील पाटील आदींच्या पथकाने केली.