मुंबई : काळ बदलला व त्याबरोबर लग्न व संसाराच्या व्याख्याही बदलल्या. मात्र या सर्वांचे मूळ असलेलं प्रेम मात्र तसंच राहिलं. प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरूणाई बेधडकपणे करू लागली आहे. लग्न न करता एकत्र राहण्याचा ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपचा पर्यायही आजची पिढी सहज स्वीकारताना दिसते. मात्र सर्वानाच हा पर्याय मान्य होईल, असं नसतं. अशाच एका प्रेमात पडलेल्या जोडप्याची गोष्ट ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत कंडिशन्स अप्लाय-अटी लागू या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणं मानवी संबंधातील नवीन प्रवाह, याविषयीचा वेध घेणारा डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
कंडिशन्स अप्लाय मध्ये कॉर्पोरेट जगतात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा या दोघांची कथा दाखवण्यात आली असून पैसा, प्रसिद्धी, उच्च राहणीमान या साऱ्या ऐहिक सुखांमध्ये प्रेमसुद्धा हरवले आहे. लग्नाच्या बंधनात न अडकता ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्याचा निर्णय हे दोघे घेतात. एकत्र असूनही वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात पुढे काय घडते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चित्रपटातून मिळणार आहे. या सिनेमात रसिकांना अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी यांचा लाजवाब अभिनय पहायला मिळणार आहे.
प्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली चार वेगवेगळ्या जॉनरची गाणी या चित्रपटात आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काही कळेना’ हे गीत रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे संगीता बर्वे लिखित हृदयस्पर्शी गीत फरहाद भिवंडीवाला, प्रियंका बर्वे यांनी गायले आहे तर ओमकार कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘मार फाट्यावर’ हे रॅप गीत आनंद शिंदे व गंधार कदम यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘मे तो हारी’ हे विरहगीत फरहाद भिवंडीवाला, आनंदी जोशी, विश्वजीत जोशी यांनी गायले आहे.
कंडिशन्स अप्लाय मध्ये सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संजय पवार यांचे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे. वेशभूषा प्रिया वैद्य यांनी केली आहे. सचिन भोसले व अमोल साखरकर चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आजच्या काळाचं प्रतिबिंब दाखवणारा हा सिनेमा निश्चितच वेगळा आहे.
कंडिशन्स अप्लाय ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.