मुंबई (श्रुती देशपांडे) : प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणार्या ‘व्हॅलेंटाइन डे’चे प्रत्येकालाच अप्रूप असते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला एखादी चांगली भेटवस्तू द्यावी, याची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू होते. पण अचानक प्रेम व्यक्त करण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा गुलाबपुष्पासारखी भेट दुसरी कुठलीच नाही. त्यामुळेच हा दिवस जवळ येताच फुलांच्या राजाचा भाव अधिकाधिक वाढू लागतो. यंदाही तोच कल दिसू लागला असून गेल्या काही दिवसांत 20 गुलाबपुष्पांची एक जुडी 100 रुपयांवरून 250 ते 300 रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती फुलविक्रेत्यांनी दिली आहे. तर त्यामुळे जर एक गुलाब दयायचा झाल्यास प्रेमवीरांना त्यामागे 50 रुपये खर्च करावे लागणार आहे.
गुलाबाची बारा फुले असलेली जुडी सध्या 50 रुपयांना विकली जाते. मात्र मंगळवारी हे दर दुप्पट होण्याची शक्यता आहे. बंगळुरू, सातारा, सोलापूर, बारामती, जुन्नर, पुणे या ठिकाणाहून गुलाबाची फुले कल्याणच्या बाजारात येत असतात. दररोज फुलबाजारात दोन हजार जुडयंची आवक होत असते. मात्र, मंगळवारी पाच हजार जुडयंची आवक होईल, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली.
‘व्हॅलेंटाईन डे’ला लाल, पिवळा, सफेद, गुलाबी रंगात असणार्या चायना गुलाबाच्या फुलांना ग्राहकांची जास्त पसंती असते. दरवर्षी दीडशे रुपयांपर्यंत मिळणार 20 चिनी गुलाबांचा गुच्छ आता दोनशे रुपयांत मिळत आहे. सर्वसाधारणपणे चार रुपयाला एक अशा दरात मिळणारा चिनी गुलाब सध्या दहा रुपयांना विकला जात आहे. सध्या गुलाबांमध्ये टॉप सिक्रेट गुलाब,बोर्डी,गुलाब,टाटा गुलाब, अशा फुलांच्या जाती बाजारात उपलब्ध आहेत.तर दादर मधील फुल मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठ समजल जाणार मार्केट मध्ये दररोज 1000 गुलाबांच्या फुलांचे बॉक्स येतात. या एका बॉक्स मध्ये जवळपास 500 ते 600 गुलाब असतात. मात्र व्हॅलेंटाईन्स डे साठी खास 1800 बॉक्स बाजारात येणार असल्याची माहिती फुल विक्रेत्यांनी दिली आहे.
गुलाबाच्या फुलांना तशी रोजच मागणी असते. मात्र व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी मागणी आधिकच असते. मागणी वाढल्यामुळे किंमतीही वाढतात.एरवी 20 रुपयाला विकणार एक गुलाब मात्र आजच्या दिवशी तब्बल 50 रुपयाला विकले जाणार आहे. – चंद्रन देवर, फुलविक्रेता, दादर