मराठा युवक-युवतींच्या मागे समाजाची ताकद उभी करा : प्रांतधिकारी कैलास कडलग

कोरोना नियमांचे पालन करीत पुस्तकाचे प्रकाशन

रावेर : मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या व शिक्षणात मागे असणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या मदतीसाठी मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे.कधी काळी गट-तटामध्ये विभागलेला मराठा समाज आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एका छताखाली आला. याचा मला सहर्ष अभिमान आहे परंतु सद्या मराठा समाजात गरीब जास्त गरीब होतोय त्यांच्या पाठीशी मराठा ताकद उभी करण्याची गरज असून शेती, राजकीय, प्रशासकीय, व्यापार, लघू उद्योग असो किंवा रोजगार देण्याचा विषय असो यात प्राधान्य मराठा समाजातील युवक/युवतींना देण्याचे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.

रेशीमबंध पुस्तकाचे प्रकाशन
रावेर येथे मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजातर्फे आयोजित वधू-वर परीचय असलेल्या ‘रेशीमबंध’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी कडलग बोलत होते. माजी आमदार अरुण पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, तहसीलदार महेश पवार, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गोपाळ दर्जी, मोटर वाहन निरीक्षक संतोष पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, सी.एस.पाटील, घनश्याम पाटील, आर.बी.महाजन, जे.के.पाटील, योगराज पाटील, घनश्याम पाटील, पी.आर.पाटील, प्रा.सी.एस.पाटील आदी मराठा समाजातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. यावेळी 58 युवती तर 85 युवकांनी विवाहासाठी रेशीमबंध पुस्तकात नाव नोंदणी केली.

अनावश्यक खर्च टाळून करावा विवाह
गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मराठा समाजाने विवाहसाठी अनावश्यक खर्च टाळुन साध्या पध्दतीने लग्न करावे. ज्यांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी रेशीमबंध वधू-वर पुस्तक एक नामीसंधी असल्याचा सल्ला त्यांनी भावी युवक युवतींना दिला.