अमळनेर। एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला करून जीवे ठार मारणार्या तरुणास 5 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजारांचा दंड, येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी ठोठावली आहे. ही चोपडा घटना तालुक्यातील पारगाव येथील आहे. अडावद येथील आरोपी प्रमोद सुरेश पाटील यांचे एका 21 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर तिचे लग्न जमलेले असतांना देखील घटनेच्या दिवशी ‘तू माझ्याशी लग्न कर’ अशी गळ घातली असतांना नकार दिल्याने दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घरी एकटी असतांना तिच्या घरात जाऊन तिला पीव्हीसी पाईप जोडण्याचे सोल्युशन पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाल्यावर त्याने तू माझी नाही तर कुणाचीच नाही असे म्हणत खिशातील चाकूने हातावर, खांद्यावर, आणि पोटावर सहा सात वार करून गंभीर जखमी केले. त्यात तिचे पोटातील आतडे बाहेर पडले होते. यामुळे ती गंभीर जखमी झाली होती.
पीडित मुलगी बचावली
घटनेच्या दुसर्याच दिवशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो निकाल लागेपर्यंत कारागृहात होता. या गुन्ह्यात तपास एपीआय वाय.ए.देशमुख यांनी केला होता. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी काम पाहिले. पुढे ऑपरेशन करून पीडीत मुलगी ही बचावली होती. सदर खटला अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु असतांना गुरुवारी न्या. दिनेश कोठलीकर यांनी ही शिक्षा सुनावली. त्यात आरोपी हा एका पायाने अपंग असल्याने कलम 307 प्रमाणे 5 वर्ष सक्तमजुरी व 40 हजार रुपयांचा दंड. व दंड न भरल्यास पुन्हा 3 वर्ष सक्तमजुरी तर कलम 452 प्रमाणे 3 वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड असा दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजुरी असा एकूण 50 हजारांचा दंड सुनावला. व दंडाची रक्कम जखमी मुलीस हिला देण्यात यावी, असा निकाल यावेळी दिला आहे.