अखेर अज्ञात मृतदेहाची पटली ओळख
पिंपरी-चिंचवड : खासगी गुप्तहेर म्हणून काम करणार्या तरुणाच्या प्रेयसीचे फोटो त्याच्या मित्राने डिलिट केले. यावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी मिळून या गुप्तहेर प्रियकराचा निर्जन स्थळी नेऊन खून केला. ही घटना रविवारी (दि. 23) पहाटे भोसरी येथील वाळके मळ्याजवळ उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खाली घडली. लवकुशकुमार रामचंद्र पांडे (वय.24 रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी. मुळ रा. बिल्हारी, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार अनिल गवारे (वय 21, रा.अभिनवनगर, जुनी सांगवी. मुळ रा.बोरगे चाळ, मारुंजी), गोपाळ ऊर्फ गोपी मुरारी गायकवाड (वय 21, रा. पाडाळे वस्ती, म्हाळुंगे. मुळ रा. निलंगा, लातूर) या दोघांना अटक केली आहे.
असा झाला उलगडा
हे देखील वाचा
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी या खुनाची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाची सुरुवातीला कोणतीच ओळख पटली नाही. त्याच्या खिशात एक कुरिअर सापडले. ते कुरिअर एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीच्या नावाने आले होते. त्यावर चौकशी केली असता खून झालेल्या तरुणाची ओळख पटली. त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्याच्या भावाने माहिती दिली की, लवकुशकुमार मागील दोन दिवसांखाली त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. या माहितीवरून राजकुमार आणि गोपाळ यांना औंध येथे सापळा लावून पकडले.
वाळके मळ्याजवळची घटना
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनीच हा खून केल्याचे मान्य केले. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली. लवकुशकुमार याच्या प्रेयसीचे फोटो राजकुमार याने डिलीट केले. यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. तसेच ते फोटो राजकुमार याच्याकडे देखील होते. ही बाब लवकुशकुमार याला माहिती होती. त्यामुळे त्याने मित्रांसमोर राजकुमार याला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे राजकुमार याने गोपाळ सोबत मिळून लवकुशकुमार याला वाळके मळ्याजवळ नेले आणि त्याचा धारदार शस्त्राने खून केला. संपूर्ण प्रकार 12 तासांमध्ये उघड केला आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.