प्रेयसीने नकार दिल्याने प्रेमविराचा आत्महत्येचा प्रयत्न

0
शहर पोलीस व अग्निशमन विभागाची घटनास्थळी धाव
जळगाव । अमरावती जिल्ह्यातील राहणार्‍या गणेश श्रीकृष्ण पवार (वय-24) या तरूणाचे नांदगाव खांदेश्‍वर येथील सुप्रिया (नाव बदललेले) या तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी गणेशने सुप्रियाला शहरातील खान्देश सेंट्रलमध्ये असलेल्या एका शॉपमध्ये नोकरी मिळवून दिली होती. दोघांचे भेटणे, बोलणे नियमीत सुरू होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गणेश गावाकडे धर्मापूर येथे तर सुप्रिया जळगावात असताना चार महिन्यांपूर्वी तिचे सोबतच काम करणार्‍या विलास पाटील तरूणाशी प्रेमाचे सूत जुळले. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया आणि विलास एकमेकांसोबत फिरत होते. ही बाब गणेशला समजल्याने त्याचे सुप्रिया सोबत भांडणही झाले होते. त्यानंतर तिने विलाससोबत काहीही संबंध ठेवणार नसल्याचे वचन दिले होते. दरम्यान आज गणेशचा वाढदिवस असल्याने तो सुप्रियाला भेटण्यासाठी जळगावी आला होता. बडनेरा येथून त्याने सकाळीच जळगाव गाठले. सुप्रियाशी मोबाईलद्वारे संपर्क साधून 10 वाजताच तो खान्देश सेंट्रलमध्ये पोहचला. सुप्रियासोबत बोलणे सुरू असताना काल 12 रोजी रात्री ती पुन्हा विलाससोबत बोलत असल्याचे त्याला समजले. त्यामुळे आज सकाळपासून दोघांचा वाद सुरू झाला. वाद वाढल्याने सुप्रियाने गणेशला नकारून प्रेमसंबंध ठेवण्यास वाढदिवसाच्या दिवशीच नकार दिल्याने गणेश संतापला होता.
गणेश याने आत्महत्त्या करण्याचा निर्णय घेतला. खान्देश सेंट्रलच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या खिडकीतून तो गॅलरीत पोहचला. सुप्रियाने ही बाब लागलीच सर्वांना सांगितली. पाण्याची बाटली घेवून कडा नसलेल्या गॅलरीतून पाय खाली टाकून गणेश बसलेला होता. तरूण आत्महत्त्येसाठी चढल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने आणि मनपा अग्निशमन विभागाने खान्देश सेंट्रल गाठले. तरूणाने आत्महत्त्येसाठी उडी मारल्यास खाली 20 जणांनी बॅनर पकडून ठेवले. काही वेळानंतर जाळी हातात धरण्यात आली. अग्नीशमन विभागाच्या वाहनाची शिडी उंच करण्यात आली.
बोलण्यात गुंतवून पकडले
तिसर्‍या मजल्यावर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्यासह कर्मचारी ओमप्रकाश पंचलिंग, नवजीत चौधरी, सुनील पाटील पोहचले होते. उपनिरीक्षक कोसे यांच्यासह इतर कर्मचारी गणेशसोबत चर्चा करीत होते. सुप्रियालाही पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवण्यास सांगण्यात आले. बोलण्यात गुंतविल्यानंतर उपनिरीक्षक कोसे हे हळूहळू गणेशच्या जवळ पोहचले. गणेशकडे असलेली पाण्याची बाटली रिकामी झाल्याने दुसरी बाटली देण्याच्या बहाण्याने कोसे त्याच्याकडे गेले. पीएसआय कोसेजवळ येताच उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या गणेशच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला मागे खेचले. त्यानंतर इतर कर्मचार्‍यांनी धावत येवून त्याला उचलले. त्यानंतर त्याला शहर पोलिसात नेण्यात आले.