मुंबई – स्ट्रग्लर असलेल्या मॉडेल प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी मनिला रामप्रकाश तिकवडे नावाच्या प्रियकराला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मनिला हा स्मॉल टाईम अॅक्टर असून बलात्काराच्या याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या मॉडेलची पोलिसांनी वैद्यकीय चाचणी केली असून त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे. मात्र याबाबत अधिक तपशील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून मनिलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पिडीत तरुणी ही स्ट्रग्लर मॉडेल असून ती सध्या मॉडलिंग क्षेत्रात आपले करिअर करण्याचा प्रयत्न करीत होती. काही दिवसांपूर्वीच तिची स्मॉल टाईम अॅक्टर असलेल्या मनिला तिकवडे या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. काही महिन्यांपासून ते दोघेही एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. यावेळी त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध आल्यानंतर त्याने तिच्याशी अलीकडेच लग्न करण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात सतत वाद होत होती. मनिलाकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध 376 (2), (एन), 313 कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या मॉडेलने त्याच्यावर तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला काल पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.