जळगाव । भुज (गुजरात) येथे कंपनीत जाण्यासाठी जळगाव येथून नागपूर अहमदाबाद (प्रेरणा एक्सप्रेस) ने जात असलेल्या युवकाचे मुळ कागदपत्र, लॅपटॉप आणि रोकड असलेली बॅग लांबविल्याचा मामला शनिवारी घडला. हा प्रकार अहमदाबाद येथे लक्षात आल्यानंतर युवकाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. नंतर तपास नंदुरबार लोहमार्ग पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला. निखील बबन सोनार (24) हा युवक महाबळ कॉलनी नूतनवर्षा कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो भुज येथे कंपनीत कार्यरत आहे. तो शनिवारी संध्याकाळी भुजला जाण्यासाठी येथून प्रेरणा एक्सप्रेसमध्ये एस.फोर सीट क्रमांक 52 या आरक्षण बोगीत बसला. सुरतपर्यंत निखील जागी होता. नंतर त्याचे डोळे लागल्यावर अज्ञात चोरट्यांनी त्याची बॅग लांबविली. दरम्यान प्रेरणा एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये अनोळखी बॅग असल्याची माहिती नंदुरबार रेल्वे पोलिसांना मिळाली. ही बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यावेळी बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रावरून ती निखिल सोनार याची असल्याचे निष्पन्न झाले.