प्रॉपर्टी वादातून तरुणाची हत्या करीत रेल्वेमार्गे पसार होणार्‍या आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व 36 काडतूस जप्त

लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : प्रॉपर्टी वादातून तरुणाची हत्या करून युपीतील पसार होण्याच्या प्रयत्नात असताना भुसावळात आवळल्या मुसक्या

Katta with 36 cartridges seized from murder accused caught in Pawan Express in Bhusawal भुसावळ : भुसावळ लोहमार्ग व बाजारपेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत वसई तालुक्यात झालेल्या हत्येप्रकरणातील आरोपीच्या डाऊन पवन एक्स्प्रेसमधून सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींची रात्री चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यात वापरलेला कट्टा जनरल बोगीतील कुपीत लपवल्याची माहिती दिल्यानंतर बर्‍हाणपूर येथे गाडी आल्यानंतर आरोपीची बॅग जप्त करण्यात आली. या बॅगेत गुन्ह्यात वापरलेला कट्टा व 36 काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, मंगळवारी मिरा-भाईंदर क्राईम ब्राँच युनिट दोनचे पोलिस निरीक्षक शाहुराज रणवरे व सहकार्‍यांनी आरोपीचा ताबा घेतला.

जमिनीच्या वादातून गोळ्या झाडत केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, वसई तालुक्यातील तिल्हेर धुमाळपाडा येथे कमरुद्दीन गियासोद्दीन चौधरी (21, वाखनपाडा, पेल्हार, नालासोपारा पूर्व) या तरुणाची रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या झाली होती. संशयीत आरोपी नईम इक्बाल अब्दुल अहमद (35, पालघर, मुंबई) व त्याच्या अन्य सोफियान नामक साथीदाराने ही हत्या केल्यानंतर पळ काढला होता मात्र साथीदार जाळ्यात अडकल्यानंतर त्याने नईमबाबत माहिती दिली व संबंधित यंत्रणेने भुसावळातील सुरक्षा यंत्रणांना सूचित केल्यानंतर डाऊन पवन एक्सप्रेसमधून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या अटकेप्रसंगी त्याच्याकडील एका बॅगेतून 36 काडतूस जप्त करण्यात आले होते मात्र गुन्ह्यात वापरलेला कट्टा आरोपीने जनरल बोगीतील कुपीत लपवल्याची माहिती दिल्यानंतर बर्‍हाणपूर येथे लोहमार्ग पोलिसांना सूचित केल्यानंतर कट्टा असलेली बॅग जप्त करण्यात आली तसेच या बॅगेतून गुन्ह्यात वापरलेले कपडेही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहराबाहेर नेत केला खून
कमरुद्दीन गियासोद्दीन चौधरी (21) या तरुणासोबत आरोपींचा मालमत्तेशी निगडीत वाद असल्याने त्यांनी रविवारी त्यास तिल्हेर धुमाळपाडा येथील पारोळ-भिवंडी रोडजवळील ठक्करभाई विटभट्टीजवळ एकांतजागी नेले व तेथे गोळ्या झाडून त्याची हत्या करीत पळ काढला मात्र मांडवी पोलिस ठाण्यातील पथकाने सोफियान या आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याने गुन्ह्यातील साथीदार व संशयीत नईम हा पवन एक्स्प्रेसने ठाण्याहून युपीतील मोतीहारी गावाकडे निघाल्याची माहिती दिल्यानंतर आरोपीच्या सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळात मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले.